
प्रेरणा पुरस्कारांनी सैन्यदलातील उत्तुंगतेचा गौरव
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः सैन्यदलातील कर्तृत्ववान सेनानींचा गौरव करण्यासाठी समाजाने पुढे येणे, हे प्रशंसनीय असून महाराष्ट्र सेवा संघाच्या ‘सॅल्युट इंडिया’ उपक्रमाच्या प्रेरणा पुरस्कारांमध्ये सुरक्षा दलातील सेनानींचे उत्तुंग कार्य सर्वांपुढे येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनन्ट जनरल शैलेश तिनईकर यांनी केले. प्रेरणा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी जनरल तिनईकर यांच्या हस्ते ग्रुपकॅप्टन सुहास फाटक (नि.), कर्नल बिपीन शिंदे (नि.) व सहायक पोलिस आयुक्त जगदीश जाधव (नि.) यांचा प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. सैन्यदलात अतुलनीय कामगिरी करून निवृत्तीनंतर समाजासाठी कार्यरत असणाऱ्या विविध अधिकारी-जवानांना संस्थेतर्फे दरवर्षी प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात येते.
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या सभागृहात सहाव्या प्रेरणा पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी प्रथम प्रमुख पाहुणे व पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांना एनसीसीच्या छात्रांनी शिस्तबद्ध संचलनाने व वाद्यवृंदाच्या तालावर मानवंदना दिली. जयहिंद कॉलेज, जोशी-बेडेकर कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज व सरस्वती विद्या मंदिर मराठी शाळेचे एनसीसी छात्र त्यात सहभागी होते.
या सोहळ्यात महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष सतीश पाटणकर यांनी सॅल्युट इंडिया उपक्रमाची व प्रेरणा पुरस्कारांची संकल्पना सांगितली. तसेच लेखक विनायक परब यांनी पुरस्कारप्राप्त सेनानींची मुलाखत घेऊन त्यांची व्यक्तिमत्त्वे व वर्दीतील तसेच वर्दीनंतरचा प्रवास उपस्थितांपुढे उलगडला. अरुणा अग्निहोत्री यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.