बोईसर-पालघर महापालिकेसाठी हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसर-पालघर महापालिकेसाठी हालचाली
बोईसर-पालघर महापालिकेसाठी हालचाली

बोईसर-पालघर महापालिकेसाठी हालचाली

sakal_logo
By

बोईसर, ता. १७ (बातमीदार) : पालघर-बोईसर ही दोन्ही शहरे मुंबईलगतची शहरे असून पालघर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी सुविधा सोडवणे ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे; तरी पालघर-बोईसर शहराचे वाढते शहरीकरण व नागरीकरण तसेच सिडकोच्या माध्यमातून या शहरांचा वाढता विकास लक्षात घेता पालघर-बोईसर महानगरपालिका होण्यासाठी खासदार राजेंद्र गावित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कळवले आहे.
पालघर-बोईसर मुख्य रस्स्यावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. पालघर-बोईसर हे ११ किलोमीटर अंतर असले, तरी दोन्ही भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. बोईसर व लगतच्या ग्रामपंचायतींना नागरी भागामुळे शहराचे रूप प्राप्त झाले आहे. मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, रिक्षा स्टँड, बँक, पोस्ट, दुकाने, मॉल, आठवडे बाजार, शाळा या बोईसर ग्रामपंचायत हद्दीत आहेत. तसेच २५ ते ३० हजार कामगार, प्रवासी येथे येत असतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वावर असतो.

-----------
औद्योगिक वसाहतीमुळे झपाट्याने विस्तार
बोईसर व लगतच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, भाभा अणु संशोधन केंद्र, तारापूर औद्योगिक वसाहत यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प परिसरात झाल्याने लोकसंख्या वाढून बोईसर-पालघरचे मोठ्या शहरात रूपांतर झाले आहे; मात्र वाढत्या नागरीकरणाचे अतिरिक्त ओझे बोईसर ग्रामपंचायतीला पेलवेनासे झाले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी तसेच शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक मर्यादा येत आहेत.

--------------
विकसकांकडून खोट्या जाहिराती
बोईसर शहर असल्याचे भासवून येथील परिसरात गृह प्रकल्प उभारले जात आहेत. अनेक विकसक नकाशावर सुंदर रस्ते, पाणी व इतर सुविधा दाखवून त्यांची जाहिरात करत आहेत. त्यातच घराच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने बेकायदा बांधकामांना उत आलेला आहे.

----------------
वाहनतळाचा प्रश्न जटील
बोईसर रेल्वेस्थानक, नवापूर नाका आणि ओस्तवाल परिसरातील वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी जटिल होत आहे. अरुंद रस्ता, फेरीवाले, रस्त्यावरच उभी केलेली प्रवासी आणि खाजगी वाहने, बेशिस्त वाहनचालक यामुळे गर्दीच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच रिक्षा, टमटम, इको या प्रवासी वाहनांना उभे राहण्यासाठी वाहनतळ नसल्याने ही वाहने स्थानक परिसर, नवापूर नाका आणि तारापूर रोडवरील स्टँडवर अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत असते.


-----------
फोफावणारी अनधिकृत बांधकामे
तारापूर औद्योगिक वसाहत सुरू झाल्यानंतर बोईसर शहराची लोकसंख्या वेगाने वाढू लागली. कारखान्यात काम करणाऱ्या बहुतांशी हजारो परप्रांतीय कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना राहण्यासाठी शहरातील भूमाफियांनी सरकारी, आदिवासी आणि वन जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत झोपडपट्ट्या तयार करण्याचा सपाटा लावला. यामुळे भागात हजारो अनधिकृत चाळी तयार झाल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायतीकडूनही त्वरेने ना हरकत दाखला आणि घरपट्टी देण्यात येत असल्याने तसेच महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने शहराला बकाल रूप आले आहे.


--------------------
पालघर-बोईसर महानगरपालिका होण्यासाठी शासन धोरण येईल, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर

------------------
महानगरपालिकेचे आम्ही स्वागत करतो. महानगरपालिका होण्यासाठी काही सामान्य अटी आहेत. पालघर-बोईसर एकत्र होण्यासाठी उमरोळी, पंचाळी, सरावली, खैरा फाटक बेटेगाव, पास्थल, सालवड, बोईसर या ग्रामपंचायती एकत्र येणे गरजेचे आहे. बहुतेक ग्रामपंचायती नगरपरिषद होण्यासाठीपण उत्सुक नाहीत. तसेच या सर्व ग्रामपंचायती मिळून लोकसंख्या २५ लाखांच्या निकषात बसत नाही. बोईसर परिसरातील एमआयडीसी महानगरपालिकेत येण्यासाठी तयार नाही, असे अनेक अडथळे आहेत.
- उज्ज्वला काळे, नगराध्यक्षा