रिक्षा चोरणारी टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा चोरणारी टोळी जेरबंद
रिक्षा चोरणारी टोळी जेरबंद

रिक्षा चोरणारी टोळी जेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून रिक्षा चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानखुर्द-गोवंडी भागातून अटक केली आहे. तसेच या टोळीने विविध भागांतून चोरलेल्या १० ऑटो रिक्षा जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून वर्षभरात ७० रिक्षाचोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अशा चोरांना आळा घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून रिक्षा चोराविरोधात विशेष मोहीम सुरू केली होती. अशाच मानखुर्द चिता कॅम्प येथे राहणारा रेहमान युसुफ खान (२३) हा खरेदी विक्री करणाऱ्या हसन इमामसाहब सय्यद (३५) याला रिक्षा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा लावून या दोघांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेने त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी रसुल अकरम खान, मोहम्मद नदीम नईम शेख, शहाबाज ऊर्फ बाटली शकिल हुशिले यांच्यासोबत मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातून अनेक ऑटो रिक्षांची चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हे शाखेने रेहमान युसूफ खान, हसन इमामसाहब सय्यद, मोहम्मद नदीम नईम खान आणि शहाबाज ऊर्फ बाटली शकिल हुशिले यांना मानखुर्द गोवंडी भागातून अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी नवी मुंबईतील दोन, मुंबईतील चार, मिरा-भाईंदरमधील दोन आणि ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल केली आहे.

दोघे जण अजून फरारी
या टोळीतील रसुल अकरम खान व नईम जेलला हे दोघे चोरटे अद्याप फरार आहेत; तर रेहमान युसुफ खान याच्यावर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात ३; तर एपीएमसी पोलिस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. हसन इमामसाहब सय्यद याच्यावर चेंबूर, कुर्ला, गोवंडी आणि एपीएमसी या पोलिस ठाण्यात प्रत्येकी-१ असे चार गुन्हे दाखल आहेत. तसेच या टोळीने अनेक रिक्षा चोरल्या असल्याची शक्यता पोलिसांना वर्तवली आहे.