
सीएसएमटी हेरिटेज म्युझियम होणार डिजिटल
हेरिटेज म्युझियम होणार डिजिटल!
‘सीएसएमटी’मधील रेल्वे म्युझियमची तिकीटविक्री ऑनलाईन
नितीन बिनेकर, मुंबई
‘सीएसएमटी’ची इमारत जगातील आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांपैकी एक मानली जाते. दररोज हजारो पर्यटक इमारतीतील हेरिटेज म्युझियमला भेट देतात. हेरिटेज वॉक आणि म्युझियम तिकीटविक्री खिडकीवर आणि तीही ठराविक वेळेत होत असल्याने पर्यटकांना अडचणी येत होत्या. आता मात्र ‘बुक माय शो’सारख्या प्लॅटफॉर्मवरून आॅनलाईन तिकीटविक्री होणार आहे.
आधुनिक काळातील स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना अशी ओळख असलेल्या सीएसएमटी रेल्वेस्थानकाच्या इमारतीमधील हेरिटेज म्युझियम पर्यटकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर स्थानकातून धावली. तेच आताचे सीएसएमटी रेल्वेस्थानक. त्याचा लौकिक जगभरात आहे. पूर्वीचे बोरीबंदर ते आताचे सीएसएमटी स्थानक असा बदललेला १६९ वर्षांचा इतिहास मध्य रेल्वेने हेरिटेज म्युझियममध्ये साकारला आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणाऱ्या हेरिटेज म्युझियमला दररोज हजारो पर्यटक आणि विद्यार्थी भेट देतात. विशेष म्हणजे, विदेशी पर्यटकांची संख्या त्यात मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत म्युझियम पर्यटकांसाठी सुरू असते. सर्वसामान्यांसाठी तिकिटाचे दर २०० रुपये आहे. विद्यार्थ्यांकडून १०० रुपये घेतले जातात. सध्या म्युझियमची तिकीट विक्री मॅन्युअल पद्धतीने म्हणजे खिडकीवर केली जाते. सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच तिकिटे दिली जातात. परिणामी पर्यटकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा सुविधेसाठी ‘बुक माय शो’सारख्या प्लॅटफॉर्मवरून म्युझियम तिकीट विक्री करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहेत.
लवकरच होणार करार
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की सीएसएमटी हेरिटेज इमारतीला भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या सुविधेसाठी आम्ही ‘बुक माय शो’सारख्या प्लॅटफॉर्मवरून म्युझियमची तिकीट विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावही आम्ही तयार केला आहे. तिकीटविक्री करणाऱ्या खासगी कंपन्यांना तो पाठविण्यात आला आहे. लवकरच हेरिटेज म्युझियमच्या ऑनलाईन तिकीटविक्रीसंदर्भात करार होणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा विदेशी आणि बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे.
हेरिटेज म्युझियमबद्दल...
- पर्यटकांसाठी वेळ : सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते संध्या. ६
- तिकीटविक्री : दुपारी २ ते संध्या. ५
- शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद
- तिकीट : सर्वसामन्य २०० रु. विद्यार्थी १०० रु.
- म्युझियम पाहण्याचा वेळ ः १ तास
रेल्वेचा १६९ वर्षांचा इतिहास
- पर्यटकांना रेल्वेचा इतिहास सांगणारी माहिती हेरिटेज म्युझियमध्ये आहे. जुनी छायाचित्रे, इमारतीचा आराखडा आणि रेल्वेच्या छोट्या इंजिनांसह अन्य वस्तू आहेत.
- १८५३ मध्ये मुंबई-ठाणे मार्गावर पहिली गाडी धावली तेव्हापासून रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. रेल्वेगाड्यांचे डबे आणि इंजिनात बदल होत गेले. १९२५ मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. अशी सगळी ऐतिहासिक चित्रे हेरिटेज म्युझियममध्ये आहे.
- ब्रिटिश काळापासून असलेली कागदपत्रे, रेल्वेगाड्यांची मॉडेल आणि जुन्या छायाचित्रांच्या रूपात आपल्याला रेल्वेचा इतिहास पाहता येतो.
- जुन्या छायाचित्रांमध्ये पूर्वीच्या काळी वापरण्यात आलेले टेलिफोन, संदेशवहनाचे मोर्स यंत्र, भांडी, कंदील, अधिकाऱ्यांचे बॅज, इंजिन आणि डब्यावरील लोगो, जुने तिकीट इत्यादी खजिनाही जतन करून ठेवण्यात आला आहे.