अनावश्यक गतिरोधक हटवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनावश्यक गतिरोधक हटवण्याची मागणी
अनावश्यक गतिरोधक हटवण्याची मागणी

अनावश्यक गतिरोधक हटवण्याची मागणी

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीची व नवीन रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या रस्त्यांची कामे करताना रस्त्यावर काही ठिकाणी अनावश्यक गतिरोधक होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या गतिरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. रविवारी (ता.८) अशाच एका अनावश्यक गतिरोधकाने एका महिलेचा बळी गेला. या महिनाभरात पालघर जिल्ह्यात गतिरोधकांवर दुचाकी आदळून मोठ्या प्रमाणात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

भिवंडी-वाडा-मनोर या ६४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावर ५० हून अधिक गतिरोधक आहेत. तसेच अंबाडी शिरसाड या मार्गावर वज्रेश्वरी, झिडके, अंबाडी, गणेशपुरी भिवाळी या गतिरोधकांवर कुठल्याही प्रकारचे पांढरे पट्टे अथवा झेब्रा क्रॉसिंग निशाणी केलेली नाही. त्याचप्रमाणे गतिरोधक असल्याबाबतचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे या गतिरोधकावर दुचाकीस्वारांचे नेहमीच अपघात होत आहेत. भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर असलेले सर्व गतिरोधक हे बेकायदेशीर आहेत, असे या महामार्गाची देखरेख करणारे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिवंडी येथील शाखा अभियंता अनिल पवार यांनी सांगितले. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या आग्रहाखातर हे बेकायदेशीर गतिरोधक करण्यात आले आहेत, असाही आरोप केला जात आहे.
---------
बेकायदेशीर गतिरोधक असतानाही ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उखडून टाकले जात नाहीत. बेकायदेशीर गतिरोधक निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही.
- मिलिंद कांबळे, सामाजिक कार्यकर्ता