शालेय विद्यार्थ्यांना पालिकेची सुरक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय विद्यार्थ्यांना पालिकेची सुरक्षा
शालेय विद्यार्थ्यांना पालिकेची सुरक्षा

शालेय विद्यार्थ्यांना पालिकेची सुरक्षा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या हेतूने नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने पालिकेच्या ५५ शाळा इमारतींमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर दिला आहे.
एखाद्या खासगी शाळांप्रमाणेच नवी मुंबई महापालिकेने शाळा इमारती उभारल्या आहेत. या अंतर्गत महापालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासही साधला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या दरवर्षी १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित असावे यादृष्टीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेतर्फे प्राथमिक ७९ आणि माध्यमिक २३ अशा शाळा चालवल्या जात आहेत. त्यापैकी पालिकेने उभारलेल्या ५५ इमारतींमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम झाली असून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
-----------------------------
चार कोटींचा खर्च अपेक्षित
नवी मुंबई महापालिकेतर्फे सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या कॅमेरा बसवण्यासोबतच त्यावर एक वर्षाच्या देखभाल दुरुस्तीचे पैसेही संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.
---------------------------------
वर्ग खोल्यांमध्येही लवकरच कॅमेरे
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या महापालिकेने शाळा इमारतीमध्ये शौचालय, वर्गाबाहेरचा मोकळा परिसर आणि जिने या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. तसेच पुढील काळात वर्गखोल्या, शिक्षक कक्ष या ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
-------------------------------------------
महापालिकेच्या ५५ शाळा इमारतींमध्ये अद्ययावत सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरे वापरण्यात येत आहेत. १९५ बुलेट कॅमेरे व ४९२ डोम कॅमेरे वापरले गेले आहेत. या यंत्रणेमुळे नवी मुंबई महापालिकेच्या शाळांची सुरक्षा सक्षम होणार आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
-------------------------------------------