तृणधान्याची लागवडीसाठी गावागावांत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृणधान्याची लागवडीसाठी गावागावांत जनजागृती
तृणधान्याची लागवडीसाठी गावागावांत जनजागृती

तृणधान्याची लागवडीसाठी गावागावांत जनजागृती

sakal_logo
By

अलिबाग, ता. १५ (बातमीदार) ः फास्टफूडच्या जगात पौष्टिक तृणधान्य खाण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे अनेक आजार बळावले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत नाचणी, बाजरी, ज्वारीसारख्या पौष्टिक तृणधान्याची लागवड करण्यासाठी गावागावात जनजागृती सुरू केली आहे. या उपक्रमाला गावागावांतील शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने भोगी सणानिमित्त शनिवारी अलिबाग तालुक्यातील महाजने येथे जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, राळा इत्यादी पौष्टिक तृणधान्यांची आहारातले महत्त्व सांगून आहारात त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी ग्रामस्थ व महिलांना आवाहन केले.
नाचणी व इतर पौष्टिक तृणधान्यापासून भाकर, पापड, इडली, डोसा, केक, बिस्कीट इ. पदार्थ बनवून गृहउद्योग उभारावा, असे गृहिणींना सूचित करण्यात आले. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे व तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे यांनीदेखील मार्गदर्शन करीत तृणधान्ये लागवडीबाबत जनजागृती केली.
आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक तृणधान्यांचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन केले; तर नाचणी उत्पादक प्रगतशील शेतकरी बाळाराम शिद यांनी नाचणी लागवडीबाबत माहिती दिली. या वेळी मोहन सूर्यवंशी, रघुनाथ जाधव, अशोक मिसाळ, नीलेश कवळे आदी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महाजने गावातील शेतकरी रामदास पाटील, सदानंद पाटील, जगन्नाथ खानावकर, ग्रामपंचायत माजी सदस्य रामचंद्र पारंगे आदी उपस्थित होते.

गावबैठकांचे आयोजन
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नवीन पिढीसह लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ तृणधान्यावर प्रक्रिया करून बनवता येणार आहे. नाचणीची नान कटाई, नाचणी सत्त्व, नाचणीचे लाडू, नाचणी आंबिल पेय, लापशी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्ल्याचे फायदे याची माहिती गावागावांत कृषी विभागाकडून देण्यास सुरुवात करण्यात आली. गाव बैठका घेऊन कृषी विभागामार्फत जनजागृतीचे कार्यक्रम जिल्ह्यात जोरदार सुरू आहेत.

...................

गोळेगणीमध्ये तृणधान्य कृषी दिंडीचे आयोजन
महिलांना जनजागृती मेळावा

पोलादपूर, ता. १५ (बातमीदार) : गोळेगणी येथे पौष्टिक तृणधान्य दिंडी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोळेगणीचे सरपंच प्रकाश दळवी, कृषी अधिकारी सूरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, रवींद्र गुंड, कृषी साहायक मनोज जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर मोरे, अनिकेत मोरे, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, महिला व कृषी कर्मचारी उपस्थित होते.
कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्याच्या दृष्टीने तृणधान्याचा आहारात अधिकाधिक वापर करणे, नाचणी वरी, राजगिरा पिकांचे लागवड क्षेत्र वाढवणे, नवीन पिढीला तृणधान्याचे आहारातील महत्त्व पटवून देणे, याकरिता जनजागृती कार्यक्रम आयोजन करणे, हा मुख्य उद्देश आहे. मधुमेह, कर्करोग, हृदयविकार हाडांचे आजार यांसारख्या आजारांना नवी पिढी बळी पडत असून समतोल व पौष्टिक तृणधान्य आहारात समावेश करणे, ही काळाची गरज असून त्या अनुषंगाने प्राथमिक शाळा गोळेगणी, माध्यमिक शाळा गोळेगणी, महिलावर्ग यांच्या उपस्थितीमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर यांनी पौष्टिक तृणधान्य दिंडी व महिलांकरिता जनजागृती कार्यक्रम हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.