
गोवंशचोरी रोखण्यासाठी आंदोलन
किन्हवली, ता. १६ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात वर्षानुवर्षे सुरू असलेली गोवंश चोरी शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा बनला असून खराडे, टाकीपठार, साकडबाव, डोळखांब भागात गोवंश चोरांनी उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे गुरे चोरणारे चोरटे व दलाल यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर डोळखांब नाक्यावर शेतकरी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जनआंदोलन करत गोवंश चोरीचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
मागील काही वर्षांपासून शहापुरात गुरे चोरणारे एक रॅकेट सक्रिय असून त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात टेहळणी करून मोठ्या प्रमाणात गुरांची चोरी होत असते. अनेकदा या चोरट्यांना व दलालांना नागरिक, बजरंग दल व गोमाता रक्षकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. मात्र हे चोरटे कायदेशीर कचाट्यातून लगेचच सुटतात आणि पुन्हा कामाला लागतात, असा सिलसिला सुरू आहे. चोरट्यांवर कडक कारवाई न करता उलट पोलिसांकडून गोमाता रक्षकांनाच शिवीगाळ, धक्काबुक्की असे प्रकार डोळखांब पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत.
गोधन चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यासाठी डोळखांब भागातील अनेक शेतकऱ्यांनी डोळखांब नाक्यावर आंदोलन केले. यावेळी नाथ संप्रदायातील बालयोगी नरेंद्रनाथ हेही आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी शंखनाद करून व आंदोलकांनी डमरू वाद्य वाजवून गोवंश चोरांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
कत्तलखान्यांवर बंदी घातली असतानाही जनावरे चोरून विशिष्ट ठिकाणी त्यांची विक्री होत असते. ही जनावरे नेमकी कुठे विकली जातात, जनावरांना दिले जाणारे भुलीचे इंजेक्शन या चोरट्यांना कसे उपलब्ध होते, असे सवाल उपस्थित करत आंदोलकांनी याबाबींची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच डोळखांब येथे देवीच्या मंदिराजवळ पोलिसांनी २४ तास गस्त घालावी, गोवंश चोरीची घटना घडल्यास गोरक्षक कमिटीच्या उपस्थितीत चोरांवर कारवाई करावी, विभागात घडणाऱ्या या घटनांची माहिती पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी आंदोलकांनी पोलिसांना दिले आहे.
-------------------
गोवंश चोरीला आळा घालण्यासाठी पुढाकार
पोलिस उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड यांनी डोळखांब विभागात गोवंशरक्षक कमिटी स्थापन करण्याबाबत व सदस्यांना घडणाऱ्या घटनांची माहिती देण्याबाबत आश्वासित केले असून गोरक्षकांच्या मदतीने गोवंशचोरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.