जेरबाई वाडिया रुग्णालयात देशातील समर्पित टीबी आयसीयू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेरबाई वाडिया रुग्णालयात देशातील समर्पित टीबी आयसीयू
जेरबाई वाडिया रुग्णालयात देशातील समर्पित टीबी आयसीयू

जेरबाई वाडिया रुग्णालयात देशातील समर्पित टीबी आयसीयू

sakal_logo
By

लहान मुलांसाठी पहिले टीबी आयसीयू
जेरबाई वाडिया रुग्णालयात देशातील समर्पित टीबी आयसीयू
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : शहरातील जवळपास प्रत्येक दहावा क्षयरुग्ण हा लहान मुलांमध्ये आढळतो. यावर मात करण्यासाठी आणि बाल क्षयरुग्णांसाठी समर्पित असलेले पहिले आयसीयू पुढील आठवड्यात परळमधील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाल क्षयरोगग्रस्‍तांसाठी परळमधील ‘बाई जेरबाई वाडिया रुग्णालय फॉर चिल्ड्रेन’ हे केंद्र सरकारचे उत्कृष्ट केंद्र आहे. त्यांचे आठ खाटांचे टीबी आयसोलेशन युनिट दोन आयसीयू बेडसह विस्तारित होणार आहे. रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी टीबीग्रस्त मुलांसाठी समर्पित बालरोग आयसीयू सुरू करणारे वाडिया रुग्णालय हे देशातील पहिले असल्याचा दावा केला आहे.
मुंबईतील समर्पित बालरोग खाटा असलेले दुसरे एकमेव रुग्णालय म्हणजे भायखळा येथील राज्य सरकार संचालित जे.जे. रुग्णालय आहे. येथे पाच आयसोलेशन बेड्स आहेत. पालिका संचालित शिवडी रुग्णालयात बाल रुग्णांना दाखल केले जात होते; परंतु काही वर्षांपूर्वी ते बंद झाले. ज्या शहरात दरवर्षी ६० हजारांहून अधिक नवीन क्षयरोग रुग्णांची नोंद होते, तेथे क्षयरोगग्रस्‍त लहान मुलांसाठीची सुविधा अत्यंत अपुरी असल्याचे आरोग्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

अनेकदा क्षयरोगग्रस्‍त मुलांना इतर संसर्गदेखील होतात. त्‍याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असते, परंतु त्यांच्या क्षयरोगाच्या स्थितीमुळे, त्यांना अनेकदा प्रवेश नाकारला जातो. क्षयरोगग्रस्‍त मुलांसाठी खाटा वाढवण्याची नितांत गरज आहे.
- गणेश आचार्य, आरोग्य कार्यकर्ते

पालिकेच्‍या अहवालात धोक्‍याचा इशारा
२०२२ मध्ये पालिकेने अहवाल सादर केला होता. या अहवालातील आकडेवारीने धोक्‍याचा इशारा दिला आहे. या अहवालानुसार क्षयरोगग्रस्‍त मुलांची प्रकरणे प्रत्येक वर्षी वाढत आहेत. २०१९ मध्ये एकूण प्रकरणांपैकी सात टक्‍के असलेले प्रमाण २०२१ मध्ये नऊ टक्‍क्‍यांपर्यंत वाढत गेले आहे.

लहान मुलांपैकी जवळपास ६० टक्‍के क्षयरोग प्रकरणे एक्स्ट्रा पल्मोनरी आहेत. क्षयरुग्णांसाठी दोन खाटांचे आयसीयू वेंटिलेशनचे काम पूर्ण होण्याच्‍या मार्गावर आहे. न्युरो क्षयरोग असलेल्या अनेक मुलांना आयसीयू केअरने चांगले उपचार मिळतील. सध्या फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग असणाऱ्या रुग्णांची चिंता वाढली आहे. यासह कोणत्याही औषधांना प्रतिसाद न देणारा क्षयरोग हा गेल्या काही वर्षांपासून आरोग्य यंत्रणेपुढील मोठे आव्हान आहे. सध्या ५ क्षयरोगग्रस्‍त लहान मुले उपचारांखाली आहेत.
- डॉ. इरा शाह, टीबी कार्यक्रमप्रमुख, वाडिया चिल्ड्रन रुग्णालय