
वसईची संस्कृती, परंपरा जाणून घेणार : आमदार सुनील शिंदे
विरार, ता. १६ (बातमीदार) : वसईची निसर्गसंपन्न अशी ओळख आहे. शेतीसोबतच येथील ख्रिस्ती, कोळी आणि आगरी समाजाने संस्कृती आणि परंपरा प्राणपणाने जपली आहे. येथे साजरा होणारा नाताळ देश आणि जगभरात प्रसिद्ध आहे. वसईत भरवण्यात येणारी ‘नाताळ गोठे’ स्पर्धा ही नाताळचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यामुळे मलाही या स्पर्धेचे कुतूहल आहे. पुढच्या वर्षी वसईत मुक्काम करून येथील संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत वसई आणि येथील लोकांचे कौतुक करतानाच ‘नाताळ गोठे’ पाहण्याचा मनोदय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.
वसई तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित ‘नाताळ गोठा’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. वसई पश्चिमेतील वाघोली सहकारी सोसायटी येथे पार पडलेल्या या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील शिंदे उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते. विजेत्या स्पर्धकांना सुनील शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. या समारंभाला सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाचे निमंत्रक जिल्हाप्रमुख पंकज देशमुख व पालघर जिल्हा-वसई सल्लागार सायमन मार्टिन हे होते. न्यू कॅसल, किरवली, पाली, होलभाट, भाट वाडी, कोक्रम वाडी, पापडी, भाटघर वाडी, रमेदी व राणे भाट, नालासोपारा हे या स्पर्धेचे विजेते ठरले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चार्ली कोरिया, जशिंथा फिंच, संजय गुरव, शशिभूषण शर्मा यांनी काम पाहिले.
शिवसेना अधिकाधिक बळकट करण्याच्या दृष्टीने संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनी शनिवारी सकाळी पालघर जिल्ह्याचा दौराही केला. या प्रसंगी त्यांच्या हस्ते पालघर उपजिल्हाप्रमुख जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. अनेक पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्याप्रति निष्ठा असलेल्या अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी नवनियुक्त पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देऊन पालघर जिल्ह्यात शिवसेना घराघरांत पोचवण्यासाठी सुनील शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.