
रेल्वे कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये रुग्णवाहिका आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. रविवारी वर्कशॉपमध्ये एका कर्मचाऱ्याचा क्रेनवरून पडून अपघाती मृत्यू झाल्यानंतर कर्मचारी संतप्त झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये रविवारी एका कर्मचाऱ्याचा क्रेनवरून पडून अपघाती मृत्यू झाला; तर एक कर्मचारी जखमी झाला. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव कृष्ण मोहन वर्मा आहे. कृष्ण क्रेनवर काम करीत असताना तो खाली पडला. त्याला आधी रेल्वेच्या भायखळा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला जसलोकला पाठवण्यात आले; परंतु तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यासाठी वर्कशॉपमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेता आले नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच एक कर्मचारी मधुकर हिरवळे हा जखमी असून त्याच्यावर भायखळा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांत अपघाताच्या सहा घटना घडल्या असून रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याने आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवार सकाळपासून काम बंद आंदोलन केले. शेवटी रेल्वे प्रशासनाने या अपघाताची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे मान्य केले; परंतु कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.