कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम
कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम

कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : स्वातंत्र्यानंतरही पाकिस्तान व चीनच्या सीमेवर काहीही फरक पडलेला नाही. पाकिस्तान देश कधीही सुधारणार नाही. भारताला कसे पाण्यात बघायचे आणि देशाचे तुकडे कसे करायचे, यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या कारवाया कधीही बंद होणार नाहीत. त्यामुळे भारताला आत्मनिर्भर आणि एकजूट होऊन कायम रहावे लागेल. भारत या देशांच्या कुरापतींना सडेतोड प्रत्युत्तर देईल, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी डोंबिवली येथे केले.

डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आर्मी डे साजरा करण्यात आला. फडके रोड येथे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी ‘सियाचेन : काल, आज आणि उद्या’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. हुतात्मा बिपिन रावत व्यासपीठावरून निवृत्त जनरल कुलकर्णी बोलत होते. सियाचिनवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत हेलिकॉप्टरमधून जमिनीवर झेप घेत भारताचा तिरंगा फडकवणाऱ्या कुमाऊ रेजिमेंटचे जनरल कुलकर्णी यांच्या हस्ते शहरातील भारतीय सैन्य दलात सेवा दिलेल्या शूरविरांचा सन्मान करण्यात आला. या वेळी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना पेंढरकर महाविद्यालयाकडून गार्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला.

------------------
अग्निपथ योजनेकडे सकारात्मकतेने पाहा
अग्निपथ योजना ही देशाच्या भवितव्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. देशातील अनेक तरुण-तरुणींना यामध्ये संधी मिळेल. तसेच या योजनेमुळे भारताच्या आर्मीचे वयदेखील तरुण राहील. या सर्व तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासारखे निवृत्त अधिकारी आहेत. त्यामुळे आपण मेहनत करू आणि यातून देश घडवू. देशातील आर्मी ही पाकिस्तान आणि चीनपेक्षाही खंबीर आहे. आपल्याला कोणत्याही सरकारचा दबाव नाही. बाकीच्या देशात राजकीय पक्ष आर्मीमध्ये अधिक हस्तक्षेप करतात; पण आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे आपला देश आर्मीच्या बाबतीत अधिक सक्षम आहे, असेही संजय कुलकर्णी म्हणाले.

-----------------------
देशप्रेमी डोंबिवलीकर म्हणून ओळख
देशात पहिल्यांदा हा आर्मी दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात डोंबिवली शहरात साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या अस्तित्वाचा कार्यक्रम आहे. डोंबिवली शहराचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवर शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. आता ही ओळख देशप्रेमी डोंबिवलीकर अशीदेखील होणे गरजेचे आहे. सैनिकांची आठवण ठेवून अभिवादन करण्याची प्रथा संपूर्ण देशात डोंबिवलीकरानी प्रथम सुरू केल्याचा मला अभिमान आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.