
चोरीस गेलेला मुद्देमाल नागरिकांना परत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : कल्याण-डोंबिवली शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरी आणि लूटमारीस गेलेला जवळपास आठ कोटींचा मुद्देमाल रेझिंग डेनिमित्त पोलिसांनी नागरिकांना परत केला. ठाण्याचे सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत हा कार्यक्रम पार पडला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चोरीस गेलेला माल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.
कल्याण-डोंबिवली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले, तरी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. कल्याण पोलिस परिमंडळ तीन अंतर्गत चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी, बँकेतील लूटमार या प्रकारचे अनेक गुन्हे घडले. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आठही पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांपैकी ८० टक्के गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. केवळ गुन्हेगारांना पकडणे एवढेच नाही, तर चोरीस गेलेला जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करण्यातही पोलिस यशस्वी झाले आहेत. डोंबिवली विभागात मागील पाच महिन्यांपासून २१ तोळे सोने, सहा कोटीची रोकड, ११ मोबाईल आणि लॅपटॉप, १२ मोटर वाहने, १४ टन सळई तसेच कल्याण विभागात ४१ लाख ५५ हजार किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने, २२ लाखाची रोकड, चार मोबाईल व लॅपटॉप, नऊ मोटर वाहने असा एकूण सात कोटी ९४ लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.