
उल्हासनगरात शासकीय योजनांचे शिबिर
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : गोरगरीब, गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेने आयोजित केलेले उल्हासनगरातील शासकीय योजनांचे शिबिर हाऊसफुल्ल ठरले आहे. या योजनांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख, माजी स्थायी समिती सभापती विजय पाटील यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध शासकीय योजनांचे शिबिर आयोजित केले होते. प्रधानमंत्री स्वनिधी योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना, इमारत बांधकाम कामगार योजना, मातृत्व वंदन योजना, नवीन शिधापत्रिका आदी शासकीय योजनांचा समावेश होता. समाजसेवक रवी पाटील व युवासेना कल्याण उपजिल्हा अधिकारी युवराज पाटील यांनी या शिबिराचा शुभारंभ केला. १५ ते १७ जानेवारी असे तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शासकीय योजना गोरगरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेला यश मिळाले असून योजनांचा लाभ त्यांना मिळणार असल्याची माहिती आयोजक उपशहरप्रमुख विजय पाटील यांनी दिली.