
खारघर परिसरात वणव्याची भीती
खारघर, ता. १८ (बातमीदार) : परिसरातील माळरानावरील गवत सुकले आहे. अशातच उन्हामुळे वणवा लागण्याच्या भीती आहे. गेल्या काही वर्षांत खारघर परिसरातील अशा वणव्यामुळे वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे वन विभागाने डोंगराच्या पायथ्याशी गवताची छाटणी करून जळीत पट्टा तयार करावा, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.
पनवेल आणि ठाणे वन विभागाकडून खारघर टेकडीवर गेल्या दहा वर्षांत पंधरा हजारांहून अधिक रोपे लावण्यात आली आहेत; तर खारघर ओवे डोंगराच्या पायथ्याशीही मोठ्या प्रमाणात रोप लागवड केली आहे. उन्हाळ्यात ही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी स्वखर्चाने पाणी देऊन झाडांचे संगोपन करत आहेत. त्यामुळे या रोपट्यांचे रूपांतर आता झाडात झाले आहे. अशातच उन्हाची वाढती तीव्रता डोंगर माळरानावरील या झाडांसाठी धोकादायक ठरण्याची भीती आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून खारघरमध्ये वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विविध प्रकारची झाडे, वनऔषधी, दुर्मिळ प्रजाती, लहान-मोठ्या रोपांची हानी, तसेच पशू-पक्ष्यांचा ऱ्हास होत आहे.
---------------------------------------
रात्रीच्या वेळी मद्यपींचे प्रताप
खारघर ओवे डोंगरावर निसर्गाचे वरदान आहे. मात्र काही मद्यपी रात्री फेरफटका मारण्याच्या नावाने आग लावून पसार होतात. त्यामुळे निसर्गरम्य परिसर म्हणून खारघरची असलेली ओळख जपण्यासाठी, वणवे रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वन कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
-----------------------------------------
खारघर-ओवे डोंगराच्या पायथ्याशी गवत कापून जळीत पट्टा तयार केला जात आहे; पण नागरिकांनीही डोंगर परिसरात लागणाऱ्या वणव्यांपासून वनसंपदा अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करावेत.
- डी. एस. सोनावणे, वन परिक्षेत्र अधिकारी, पनवेल वनविभाग