
चारोटी बागेला पर्यटकांची प्रतीक्षा
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. १८ : डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून चारोटी येथे बाग उभारण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी या बागेचे उद्घाटन करण्यात आले होते, पण त्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळे ही बाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. असे असतानाही ही बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बाग या भागातील पर्यटनासाठी खुली करावी, अशी मागणी होत आहे.
डहाणू तालुक्यातील चारोटी गाव हे खासदार पूनम महाजन यांनी दत्तक घेतले होते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून या गावातील पाणी, वीज, रस्ते या पद्धतीत सुधारणा केल्या होत्या. खासदार निधीतून चारोटी नाका येथे महामार्गाशेजारी असलेली वन विभागाची पडीक तीन एकर जागा आदर्श खासदार ग्राम योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनस्थळ तयार करण्यासाठी वापरण्यात आली. येथे विविध वारली पेंटिंग, खेळणी, व्यायामाची साधने, फुलझाडे लावून ही बाग सुशोभित करण्यात आली आहे. या निसर्ग पर्यटन स्थळाचे दोन वर्षांपूर्वी चारोटीचे सरपंच महादेव तांडेल, कासाचे सरपंच रघुनाथ गायकवाड, कासा वन परिक्षेत्राचे पूर्वीचे वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील यांच्या हस्ते झाले होते. पण काही महिन्यांतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही बाग पर्यटनासाठी बंद करण्यात आली. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. तसेच अनेक पर्यटन स्थळे पर्यटकांसााठी खुली करण्यात आली आहेत. असे असताना निसर्ग पर्यटनस्थळ असलेली चारोटी येथील बाग बंद आहे. त्यामुळे ही बाग पर्यटकांसाठी खुली करावी, अशी मागणी होत आहे.
....
बाग पर्यटनासाठी उपयुक्त
चारोटी हे मुंबई-अहमदाबाद तसेच डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून आसपास पंचवीस ते तीस किलोमीटरपर्यंत निसर्ग पर्यटन बाग नाही. त्यामुळे येथील लोकांना डहाणू समुद्रकिनारा, वापी, सिल्वासा येथील गार्डनमध्ये जावे लागते. सुट्टीमध्ये लहान मुलांना करमणुकीचे साधन नसल्याने ही बाग नक्कीच पर्यटनासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ही बाग खुली व्हावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
..
चारोटी आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत निर्माण केलेली बाग कोरोनामुळे खुली झाली नाही. सध्या या बागेत काही डागडुजीची कामे करावी लागतील. त्याकरीता काही निधीची गरज आहे. त्यासाठी मागणी केली आहे. तसेच बागेची निगा राखणे, त्यात काही सुधारणा करणे यासाठी उपाययोजना करावी लागेल. आम्ही प्रशासनाकडे ही बाग पर्यटनासाठी खुली करावी, अशी मागणी केली आहे.
- भगवान तांडेल, सरपंच, चारोटी
...
चारोटी बागेत अनेक डागडुजीची कामे करावी लागतील. या कामासाठी निधी मिळाल्यावर ही कामे पूर्ण करून बाग लवकरच पर्यटकांसाठी खुली केली जाईल.
- सुजय कोळी, वनक्षेत्रपाल, कासा