
एपीएमसीत पादचाऱ्यांची गैरसोय
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः बेकायदा बांधकाम, फेरीवाले, मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर नवी मुंबई महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे; पण एपीएमसी सेक्टर १९ येथील बाजारातील वाढीव जागेतील अतिक्रमणाकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पदपथांवरून चालणेही कठीण झाले आहे.
माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या आहे. हा रस्ता हा पाचही बाजाराला जोडला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. त्यात रस्त्यावरच पार्किंग असते. अशा परिस्थितीत येथील व्यापाऱ्यांनी बाजार मार्जिनल स्पेसमध्ये स्वतःचा व्यवसाय थाटले आहेत. यात इलेक्ट्रॉनिक, किराणा आणि किरकोळ बाजार असून विविध प्रकारची दुकाने आहेत. यामुळे या पदपथावरून चालणेही अवघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या काळात या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली होती; परंतु आता पुन्हा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे स्वस्तात वस्तू मिळत असल्यामुळे नवी मुंबईसह विविध उपनगरातून येणाऱ्या नागरिकांना चालणे जिकिरीचे झाले आहे.
---------------------------------------------
एपीएमसी मार्केटमधील मार्जिनल स्पेसमध्ये अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असते. कारवाई केल्यानंतर दुकानदार पुन्हा अतिक्रमण करतात. त्यामुळे पुन्हा कारवाई करण्यात येईल.
- अमरीश पटनिगिरी, उपायुक्त अतिक्रमण, नमुंमपा