वायू प्रदूषणाने वाशीत नाकीनऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायू प्रदूषणाने वाशीत नाकीनऊ
वायू प्रदूषणाने वाशीत नाकीनऊ

वायू प्रदूषणाने वाशीत नाकीनऊ

sakal_logo
By

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : वातावरणात सध्या गारठा पडला आहे. त्यात एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत प्रदूषित वायू सोडले जात आहेत. त्यामुळे दाट धुक्याबरोबरच होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे वाशी परिसरात अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आठवडाभरापासून नवी मुंबईत थंडी वाढली आहे. त्यामुळे हवेत गारवा असल्याने सकाळी दाट धुके पडत आहे. अशातच रात्रीच्या एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यांमधून प्रदूषित वायू सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वाशी विभागातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. सध्य स्थितीत वाशीतील हवेची गुणवत्ता दररोज ३०० च्या वर जात आहे. त्यामुळे अशी हवा आरोग्यास अतिशय खराब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हीच परिस्थिती पावणे, कोपरी सेक्टर २६, तुर्भे विभागात आहे. येथे रात्रीच्या वेळी प्रदूषित हवेतील उग्रवासाने नागरिकांना मळमळ तसेच श्वास घेण्यासही अडचण येत आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळाने अशा कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
--------------------------------------------
कोपरी सेक्टर १६ भागात रात्रीच्या वेळी प्रदूषित वायू सोडण्यात येणाऱ्या कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले आहे, पण त्याकडे दुर्लक्षच होत असल्याने तीव्र आंदोलन करणार आहे.
- संकेत डोके, उपाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई
-------------------------------------------
एमआयडीसी भागातून रात्रीच्या वेळी प्रदूषित वायू सोडण्यात येणाऱ्या कारखान्यांचा शोध घेण्यासाठी भरारी पथके तयार केली आहेत. त्यांच्या माध्यमातून गस्त घालण्यात येत आहे.
- जयंत कदम, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई