
चौक पदपथ झाला चकाचक
सात वर्षांनंतर चौक-पदपथ चकाचक
कांदिवलीतील घुसखोरांना शिवसैनिकांनी हुसकावले
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः शहरातील मुख्य भाग असलेल्या वसंत कॉम्प्लेक्स चौक परिसरातील मुख्य सिग्नल आणि पदपथावर अज्ञात व्यक्तींनी बस्तान मांडले होते. परिणामी सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौक आणि पदपथावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. पालिका, वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तब्बल सात वर्षे नागरिकांनी त्रास सहन केला. अखेर शिवसैनिकांनी तीन दिवस पहारा देऊन घुसखोरांना हुसकावून लावल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
वसंत कॉम्प्लेक्सच्या सिग्नल परिसरातील चौक, सेल्फी पॉईंट पदपथ आणि दुभाजकामध्ये जवळपास २०० अज्ञात परप्रांतीयांनी सात वर्षांपासून ठाण मांडले होते. श्रावणनगर, एकतानगर, सुंदरनगर, आदर्शनगर व चारकोप परिसरात चोऱ्या करत त्यांनी थैमान माजवले होते. रस्त्यावर पदपथावर अन्न शिजविणे, जेवणे, झोपणे, नैसर्गिक विधी करणे, भररस्त्यात लहान मुलांचे खेळणे, वाहनचालक-प्रवाशांकडून जबरदस्तीने भीक मागणे, मारामारी, भांडणे, दारू पिऊन रस्त्यावरच गोंधळ घालणे इत्यादी प्रकार त्यांनी सुरू ठेवला होता. परिणामी स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक हैराण झाले होते. त्या संदर्भात ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत नवनिर्वाचित शिवसेना शाखा क्र. २० चे शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी पालिका आणि पोलिसांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. रविवारी शिवसैनिकांसह जाऊन घुसखोरांना जागा रिकामी करण्यास सांगितले. सोमवारी सकाळी ५० ते ६० शिवसैनिकांनी सर्व घुसखोरांना हाकलण्यास सुरुवात केली. त्या वेळी काही काळ हमरीतुमरीही झाली. त्यानंतर पालिका अधिकारी आणि पोलिसांना कळविण्यात आले. विजय मालुसरे यांनी चारकोप पोलिस ठाणे, महापालिका व शाखा क्र. २० च्या कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वतः सर्व घुसखोरांना पळवून लावले आणि पूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला.
उप विभागप्रमुख अनंत नागम, विधानसभा समन्वयक अभिषेक दळवी, शाखा संघटक प्रियांका देसाई, शाखा समन्वयक सविता देसाई, गणेश कदम, शिवसैनिक रवींद्र वळंजू, गणेश सावंत, दीपक दरेकर आणि रहिवासी मोठ्या प्रमाणात मोहिमेत सहभागी झाले होते.