एसआरए प्रकल्प सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआरए प्रकल्प सुरू होणार
एसआरए प्रकल्प सुरू होणार

एसआरए प्रकल्प सुरू होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विविध कारणांनी प्रलंबित राहत आहे. प्रशांत नगर येथील प्रकल्पालादेखील विलंब होत असल्याची बाब नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार यासंदर्भात केळकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन अधिकाऱ्यांशी व संबंधित विकसकाशी चर्चा करून प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाचा जाब विचारला. तसेच हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार येत्या दिवाळीपर्यंत एक विंग पूर्ण करून रहिवाशांना ताबा देण्याचे विकसकाने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे; तर उर्वरित रहिवाशांना मार्च २०२४ अखेरपर्यंत ताबा देण्याचे मान्य केल्याने प्रशांत नगरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

ठाण्यातील तीन हात नका येथील प्रशांत नगर परिसराचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद पडले होते. त्यामुळे या प्रकल्पात बाधित झालेले रहिवासी चिंतातुर झाले होते. याची तक्रार त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली. त्यानुसार बुधवारी (ता. १८) केळकर यांनी एसआरए कार्यालयात रहिवाशांना सोबत घेऊन संबंधित प्रकल्पाचे विकसक, एसआरएचे अधिकारी यांची भेट घेतली. या वेळी माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी आणि राजेश मढवीदेखील उपस्थित होते. त्यानुसार गुरुवारपासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होईल असे आश्वासन विकसकाने दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच दर महिना एसआरएचे अधिकारी, स्थानिक माजी लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांची एक टीम या प्रकल्पाची माहिती घेणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर रहिवाशांच्या हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरदेखील उतरू, असा इशाराही केळकर यांनी दिला.