कोल्हापूर चित्रनगरी अद्ययावत करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर चित्रनगरी अद्ययावत करणार
कोल्हापूर चित्रनगरी अद्ययावत करणार

कोल्हापूर चित्रनगरी अद्ययावत करणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येणाऱ्या काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, कोल्हापूर चित्रनगरीचे प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे आर्किटेक्ट इंद्रजीत नागेशकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोयी-सुविधा निर्माण करताना त्या आधुनिक काळाशी सुसंगत असतील, तसेच या कामांची गुणवत्ता टिकून राहील याकडे लक्ष देण्यात यावे. येणाऱ्या काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना कोल्हापूर चित्रनगरीचा अधिकाधिक विकास आणि आधुनिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे. यासंदर्भातील नियोजन करून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबरोबरच आवश्यक त्या निविदा काढण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
...
महाराष्ट्रावर चित्रपटांना सवलत
येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील संतांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्यावर मराठीव्यतिरिक्त इतर भाषांमध्ये सिनेमा निर्मिती होत असल्यास मराठी सिनेमांना चित्रीकरणासाठी जी सूट देण्यात येते ती इतर भाषांमध्ये बनणाऱ्या सिनेमांना देण्याबाबत विचार करता येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी सांगितले.
...
रेल्वेस्थानकाचा कायमस्वरूपी सेट
कोल्हापूर चित्रनगरी येथे कायमस्वरूपी रेल्वेस्थानकाचा चित्रीकरण सेट तयार करण्यात येत आहे. या रेल्वेस्थानकाच्या एका बाजूस शहरी बाजू आणि दुसरीकडे ग्रामीण बाजू तयार करण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार आगळेवेगळे असावे यासाठी एक स्पर्धा घेऊन संकल्पना चित्र अंतिम करावे, अशा सूचनाही या वेळी मुनगंटीवार यांनी दिल्या. आजच्या बैठकीत सौरऊर्जा प्रकल्प बसवणे, बाह्य स्रोतांद्वारे सुरक्षारक्षक पुरवणे, कर्मचारी पुरवणे, कोल्हापूर चित्रनगरीत आवश्यक तेथे पथदिवे लावणे, पाण्याची उच्चतम टाकी बांधणे या विषयांवरही चर्चा करण्यात आली.