शिक्षक मतदार संघात शिक्षक आमदार असावा

शिक्षक मतदार संघात शिक्षक आमदार असावा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कोकण शिक्षक मतदार संघाची धुरा कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आहे. उमेदवार म्हात्रे यांच्यासोबत ते सध्या मतदार संघ पिंजून काढत आहेत. शिक्षक संघटनांचे अनेक प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावत त्यांना न्याय दिला आहे. म्हात्रे यांना अनेक संघटनांचा पाठिंबा आहे. शिक्षक मतदारसंघात शिक्षकच आमदार असला पाहिजे, असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

याविषयी मंत्री चव्हाण म्हणाले, हा मतदार संघ गेली अनेक वर्षे युतीचा म्हणून मानला जात होता. शिक्षक परिषदेच्‍या उमेदवारास शिवसेना व भाजप पाठिंबा देत असे. अनेक वर्षांची ती प्रथा-परंपराच होती, परंतु गेल्या निवडणुकीत काही घटना अशा घडल्या, की उजव्या विचारांचे असलेले मोते, कडू आणि म्हात्रे हे एकमेकांविरोधात उभे राहिले. मतांचे विभाजन झाल्याने पराभव पत्करावा लागला, परंतु आता तसे होणार नाही. सर्वांनी एकत्रित हे ठरवले आहे की शिक्षक परिषद, शिवसेना आणि भाजप या सगळ्या संघटनांचा मिळून एकच उमेदवार दिला पाहिजे. त्यासाठी म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली आहे. म्हात्रे हे शिक्षक आहेत आणि शिक्षक मतदार संघात शिक्षकच आमदार असला पाहिजे, असे मला वाटते असे ते म्हणाले.

भाजपला धडा
कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीत उमेदवार बाळाराम पाटील आणि युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट ही लढत होत आहे. २०१७ च्या निवडणुकीत मोते यांना डावलत वेणुनाथ कडू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिक्षक परिषदेने घेतला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मोते यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिक्षक परिषदेला भोवली आणि कडू यांचा पराभव झाला. झालेली बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराने अनपेक्षितपणे मारलेली मुसंडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा हे सारेच मुद्दे शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्या पथ्यावर पडले आणि त्यांचा विजय झाला होता. शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. या पराभवातून भाजपने आता धडा घेतला असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com