बीएमसीच्या एफडी मोडणे ही चिंताजनक गोष्ट : खासदार सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएमसीच्या एफडी मोडणे ही चिंताजनक गोष्ट : खासदार सुप्रिया सुळे
बीएमसीच्या एफडी मोडणे ही चिंताजनक गोष्ट : खासदार सुप्रिया सुळे

बीएमसीच्या एफडी मोडणे ही चिंताजनक गोष्ट : खासदार सुप्रिया सुळे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : केंद्र सरकारकडे खूप पैसे आहेत. त्याची कमतरता येणार नाही; मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली. ही एक चिंताजनकच गोष्ट आहे, असे विधान करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. एफडी कधी मोडतो, जेव्हा अडचण येते तेव्हा; मग अशी काय अडचण आली आहे, असा सवाल सुळे यांनी ठाण्यात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
देशाचे पंतप्रधान एकदा निवडून आल्यावर ते पक्षाचे नाही, तर देशाचे प्रधानमंत्री होतात. अशी आठवण त्यांनी करून देताना, देशाचे पंतप्रधान जर मुंबईत येऊन मुंबईसाठी काहीतरी करणार असतील, तर त्याचे मनापासून स्वागत झाले पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांचा मानसन्मान हा आम्ही आणि आपण सर्वांनी केलाच पाहिजे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शनिवारी ठाण्यात एका मॉलमध्ये बचत गटाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी खासदार सुळे ठाण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र यांचे सरकार असे आपण म्हणतो. मध्यंतरी या सरकारला ईडी सरकार हे देवेंद्र फडणवीस यांनीच संबोधले होते. राज्यात एकतर दडपशाही आणि प्रलोभन दाखवले जात असल्याचा आरोप करताना, गेली अनेक वर्षे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये हे पाहिले आहे. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. सध्या प्रलोभनासोबत दडपशाही ही केली जात आहे, असे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीबाबत विचारले असता आघाडीबाबत चर्चा होईलच; तसेच वरिष्ठ नेते मंडळी बसून त्याच्यावर निर्णय घेतील, असेही खासदार सुळे यांनी या वेळी जाहीर केले.

----------------
अंधश्रद्धेविरोधात लढा चालू राहणार
नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेवर आपले उभे आयुष्य खर्च केले, त्यांची हत्या झाली. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. याचा विरोध आपण सर्वांनी करून त्यांच्याविरोधात आपण सर्वांनी लढले पाहिजे. श्रद्धाही असलीच पाहिजे; पण अंधश्रद्धेविरोधात आमचा लढा सातत्याने चालू राहील. ही दाभोळकरांना श्रद्धांजली आणि आदरांजली राहील, असे खासदार सुळे यांनी या वेळी स्‍पष्ट केले.