
वाडा, कुडूसमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात
वाडा, ता. २२ (बातमीदार) : पाठीवर बॅग आणि बॅगेत रंगाच्या पेट्या, ब्रश घेऊन वाडा, कुडूसचे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या उत्साहात जमा झाले होते. निमित्त होते ‘सकाळ बालचित्रकला स्पर्धे’चे. सकाळच्या थंडीत कुडकुडत आठ-सव्वा आठच्या सुमारास अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावत या स्पर्धेत सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिला. यावेळी रंगछटांच्या दुनियेत विद्यार्थी रंगून गेल्याचे पाहावयास मिळाले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने रविवारी राज्यभरात बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वाड्यातील पी. जे. हायस्कूल व कुडूस येथील ह. वि. पाटील विद्यालय येथेही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुडूस येथील ह. वि. पाटील विद्यालयामध्ये ‘अ’ गटात ६, ‘ब’ गटात २, ‘क’ गटात ९८ तर ‘ड’ गटात २५ असे एकूण १३१ विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश पाटील, कलाशिक्षक आर. व्ही. खरपडे, ए. टी. पाटील, व्ही. जे. कुडील, डी. एन. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाडा येथील पी. जे. हायस्कूलमध्ये ‘अ’ गटात ६, ‘ब’ गटात ६ , ‘क’ गटात १७८, तर ‘ड’ गटात ४५ असे एकूण २३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. येथे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बी. के. पाटील, कलाशिक्षक पी. पी. चौधरी, राहुल माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
.....
वाडा : पी. जे. हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.