खामकरवाडीत रंगली बहारदार हुर्डा पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खामकरवाडीत रंगली बहारदार हुर्डा पार्टी
खामकरवाडीत रंगली बहारदार हुर्डा पार्टी

खामकरवाडीत रंगली बहारदार हुर्डा पार्टी

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार) : कोवळ्या लुसलुशीत ज्वारीच्या कणसांच्या दाण्यापासून विस्तवावर भाजलेला गरमागरम हुर्डा, त्याच्याबरोबर हरभऱ्याचे चविष्ट डहाळे, शहरीकरणात हरवत चाललेल्या गावपणाची आठवण यावी यासाठी बैलगाडी, बैल जोड्या, नंदीबैल, घरासमोर तांब्याचा चकचकीत बंब आणि घनघाळे, घासलेटचे लुकलुकणारे कंदील, शेणमातीने सारवलेली घरे अशा गावाकडील जुन्या आठवणींना उजाळा देत खामकरवाडीत झालेल्या हुर्डा पार्टीचा बेत फक्कड झाला. गुलाबी थंडीतही त्याचा आस्वाद घ्यायला रसिकांनी एकच गर्दी केली होती.
जय भवानी पारंपरिक सेवा मंडळाचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून ‘खावा मराठमोळा रानमेवा, हुर्डा पार्टीचा आनंद घ्या’ हा विशेष कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमांतर्गत खुंटवली परिसरातील खामकर वाडीमध्ये हुर्डा पार्टी आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक मराठी लावण्यांमुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सोलापूर येथून आणलेल्या ज्वारीच्या अस्सल कणसांचा हुर्डा तयार करताना तो पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
-----------------------------------------------------------
अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ
खुंटवली भागातील विविध महिला प्रतिनिधींच्या सहकार्यातून खामकरवाडी येथील टिपेनचा वाडा, गणेशनगर येथील कळमकर वाडा, डावरे वाडा, मुरलीधरनगर येथील हिरकणी वाडा, खान्देश वाडा अशा विविध वाड्यांमधील अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची लज्जत, झणझणीत मिसळ, चहा आणि मसाले दुधाबरोबरच राजस्थानी थाळीचा बेत, भरली वांग्याची रसरशीत भाजी, भरीत, पुरणपोळी यांच्‍या मेजवानीसमवेत अंबरनाथवासीयांनी हुर्डा पार्टीचा आस्वाद घेतला. माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, राजेंद्र वाळेकर, ॲड. निखिल वाळेकर, पद्माकर दिघे, प्रकाश डावरे, संजय गावडे, मिलिंद गान आदींनी हुर्डा पार्टीच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
-----------------------------------------------------
सध्या हुर्डा म्हणजे काय, तो का आणि कधी खावा याची पुरेशी माहिती शहरवासीयांना नाही. ती व्हावी या हेतूने दुसऱ्या वर्षी हुर्डा पार्टी आयोजित केली आहे. यासाठी कोणाकडून कसलीही वर्गणी घेतली जात नाही. ग्रामस्थ, पदाधिकारी तयार केलेले झोपडे सारवतात, सजवतात. त्यांच्या घरी स्वकष्टाने बनवलेले चवदार जेवण आणून हुर्डा पार्टीमध्ये उपस्थितांना मोफत जेऊ घालतात.
- अरविंद वाळेकर, अध्यक्ष, जय भवानी पारंपरिक सेवा मंडळ, अंबरनाथ.