
भिवंडी अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिके
भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : केंद्रीय गृह मंत्रालयाने तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवा मुंबईच्या वतीने २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील एक शाळा निवडून त्या शाळेमध्ये अग्निशमनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील अंजुरफाटा येथील ओसवाल शिक्षण व राहत संघ संचालित श्री हालारी विसा ओसवाल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज आणि श्री हालारी विसा ओसवाल इंग्लिश अकादमी आदी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आग विझविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सरकारी निर्देशानुसार शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांची अग्निशमन व्यवस्थापन टीम आणि १० सब टीमची उभारणी करून अग्निशमन दलाचे स्टेशन व्यवस्थापक गुरुचरण पंडुरे, चंद्रकांत धानवा, अमोल किणी, नरेंद्र बावणे यांनी संपूर्ण टीमकडून पूर्वतयारी करून घेतली. २० जानेवारी रोजी अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी विद्यार्थी, शिक्षकांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रात्यक्षिके सादर केल्याचे सांगितले. याप्रसंगी ट्रस्टचे सचिव मनीष शहा, सदस्य नील हरिया, संदीप जखरिया, मुख्याध्यापिका अनिता सिंह, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, भिवंडी पालिका आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.