
महावितरण पथकास मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
डोंबिवली, ता.२३ : थकबाकीपोटी खंडित केलेला वीज पुरवठा सुरू झाला असल्याचे आढळल्याने कारवाई करण्यासाठी गेलेल्या भरारी पथकातील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना डोंबिवलीतील आजदे गाव येथे घडली आहे. पथकातील कर्मचाऱ्यासह महिला विद्युत सहायकाला देखील यावेळी शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी नागेश गमरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
डोंबिवली आजदे परिसरात महिला विद्युत सहायक विजया भुयारकर या बाह्यस्रोत कर्मचारी आकाश गिरी याच्यासह तपासणीचे काम करत होत्या. रघुनाथ आवटे या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकी पोटी खंडित करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी परस्पर केबल जोडून वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार कारवाई करताना भाडेकरू असणाऱ्या आरोपी गमरे याने बाह्यस्रोत कर्मचारी आकाश गिरी यांना मारहाण केली व महिला विद्युत सहायक भुयारकर यांना शिवीगाळ केली.
----------------------------------------------
तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
कळवा, ता. २३ (बातमीदार) : शिळ-डायघर परिसरातील शिळ गावातील तलावामध्ये सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
शिळ गावातील तलावामध्ये काही नागरिकांनी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका ४४ ते ४५ वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे पहिले. त्यांनी ही गोष्ट तात्काळ शिळ-डायघर पोलिसांना कळवले. या पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आला आहे. या संदर्भात शिळ डायघर पोलिस अधिक तपास करीत आहेत.