
व्यंधत्व असूनही तरुणीची फसवणूक
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : मुंबईच्या परळ भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने शारीरिक व्यंग असल्याची बाब लपवून ठेवत नवीन पनवेल भागातील एका २७ वर्षीय तरुणीसोबत विवाह करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पतीसह त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवीन पनवेल भागात आई-वडील व भावासह राहणाऱ्या तरुणीचा विवाह मुंबईच्या परळ भागात राहणाऱ्या एका तरुणासोबत झाला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये विवाह झाल्यानंतर तरुणी पतीसह महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्या पतीने तिला शारीरिक सुख देऊ शकत नसल्याचे सांगितले होते. तसेच शरीरसंबंध ठेवण्यासही नकार दिला होता. त्यामुळे तरुणीने पतीला ठाणे येथे औषधोपचारासाठी नेले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याच्यामध्ये वंध्यत्व असल्याचे सांगितले होते. तसेच औषधोपचारदेखील केले होते. मात्र, संबंधित तरुणाने उपचार घेण्यास नकार दिल्याने अखेर पीडित तरुणीने झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला होता. या वेळी तरुणीच्या पालकांनी संबंधित तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांनी मुलीला सासरी पाठवल्यास मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तरुणीने खांदेश्वर पोलिस ठाणे तसेच महिला आयोगाकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे.