पुढील पन्नास वर्षांत क्लस्टर अशक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील पन्नास वर्षांत क्लस्टर अशक्य
पुढील पन्नास वर्षांत क्लस्टर अशक्य

पुढील पन्नास वर्षांत क्लस्टर अशक्य

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : जुन्या ठाणेकरांना क्लस्टरची जबरदस्ती करणारे शिंदे सरकार क्लस्टरमध्ये न आल्यास तुरुंगामध्ये टाकू, अशी धमकी देत होते; पण काही वृत्तपत्रांनी बातमी उचलल्यानंतर त्यांनी माघार घेतली व विकासकामांना परत एकदा सुरुवात झाली. आता या क्लस्टरअंतर्गत विविध पक्षांतील नगरसेवकांच्या गळ्याशी फास आणून त्यांना पक्षात ओढण्याचे काम सुरू झाले आहे. पण पुढच्या ५० वर्षांत क्लस्टर अशक्य आहे. नागरिकांनी स्वप्न तीच दाखवावी, जी पूर्ण होतील, असा टोला आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लावला आहे.

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांचे नावही पुढे आले आहे. गेल्या वेळी त्यांच्या प्रभागात झालेल्या एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी लोकमान्य नगरचाही क्लस्टर विकास करण्याचे आश्वासन दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.

आजच्या जिवंत असलेल्या दोन पिढ्या सोडूनच द्या. त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांना क्लस्टर बघायला मिळाले, तर त्यांचे नशीब, असे ते म्हणाले आहेत. १०० एकर मोकळ्या जमिनीवर प्रसिद्ध विकसक २० वर्षे इमारती बांधू शकले नाहीत; तर पुढच्या ५० वर्षांत क्लस्टर कसे काय होणार? क्लस्टरमुळे झोपडपट्टी पुनर्विकास पूर्णपणे बंद झाले आहेत. स्वप्न सत्यात उतरतील, तेवढीच दाखवायची असतात. जनता मूर्ख नसते, असेही त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.