जव्हार, मोखाड्यातील मजुरांची वणवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हार, मोखाड्यातील मजुरांची वणवण
जव्हार, मोखाड्यातील मजुरांची वणवण

जव्हार, मोखाड्यातील मजुरांची वणवण

sakal_logo
By

वाडा, ता. २५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व विक्रमगड या भागांतील आदिवासी मजुरांना रोजगार उपलब्ध नसल्याने येथील शेकडो मजुरांना रोजगाराच्या शोधात कुडूस अंबाडी येथे यावे लागत आहे. येथील माळरानावर अक्षरशः माणसांचा बाजार भरत आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांचे मोठ्या प्रमाणावर दर वर्षी स्थलांतर होत असते. या वर्षी ही तीव्रता अधिक दिसत आहे.

जव्हार, विक्रमगड, मोखाडा या तालुक्यांतील दर वर्षीच्या दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मजुरांना पर्याप्त मोबदल्यासह मुबलक रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर दर वर्षी स्थलांतर होत असते. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, पिण्याला पाणी नाही, अशा परिस्थितीत करायचे काय, या चिंतेमुळे या वर्षीही मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. कधी दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा अनेक नैसर्गिक संकटामुळे मजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

वाडा व भिवंडी तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने येथे इमारतींची बांधकामे, कारखान्यात कामे मिळत असल्याने रोजंदारीचा दरही चांगला आहे. तसेच सात-आठ महिने कामाची हमी मिळत असल्याने शेकडो कामगार येथे स्थलांतर करीत असतात. कुडूस अंबाडीत एका मजुराला ४०० ते ४५० रुपये रोजचा दर मिळत असल्याने व कामाची हमी मिळत असल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगडमधील शेकडो आदिवासी मजूर येथे येतात.
----
आमच्या भागात रोजगार नसल्याने आम्हाला रोजगारासाठी या भागात यावे लागते. आमच्याकडे १५० ते २०० रुपये मजुरी प्रतिदिन मिळते. या भागात ४०० ते ४५० रुपये मजुरी मिळत असल्याने आम्ही दरवर्षी इथे रोजगारासाठी येत असतो.
- सोमनाथ दोंडगा, बोरोठी, जव्हार
---
स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे उलटली, तरी आम्हा आदिवासींना रोजगारासाठी वणवण फिरावे लागत आहे, हे सरकारचे अपयश आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला आज या गावात, तर उद्या दुसऱ्या गावात जावे लागते.
- सुरेश जाधव, वांगणपाडा, जव्हार