सायबर गुन्हेगारांचा वाढता विळखा

सायबर गुन्हेगारांचा वाढता विळखा

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ५ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चोरटेही आता हायटेक झाले आहेत. या हायटेक म्हणजेच सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वसई-विरार, मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालय परिसरात वाढत असल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. २०२१ मध्ये ९९४ इतक्या सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. यात गेल्या वर्षभरात जवळपास १७४४ म्हणजेच जवळपास दुपटीने वाढून दोन हजार ७३८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामुळे वसई-विरारसह मिरा-भाईंदर शहराला सायबर गुन्ह्यांचा विळखा पडला आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसॲपसह मोबाईल क्रमांकावर सायबर गुन्हेगार विविध प्रकारचे संदेश पाठवून नागरिकांना फसवून त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास करतात. यासाठी आता ओटीपीपेक्षा यूपीआय पिनचा वापर अधिक होत असल्याचे तपासातून समोर आले आहे. गुन्हेगार या यूपीआय पिनच्या माध्यमातून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या पुंजीवर डल्ला मारतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर पश्चातापाची वेळ येते आणि त्यानंतर ते थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवतात. पोलिस आयुक्तालय क्षेत्रात असे प्रकार वाढू लागले असून नागरिकांनो सावधान राहा व त्वरित तक्रार नोंद करा, असे आवाहन सायबर गुन्हे कक्षाकडून करण्यात येत आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय अंतर्गत सायबरविषयक तक्रारींची चौकशी व सायबर गुन्ह्यांच्या तपासाकरीता गुन्हे शाखा अंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारीसंदर्भात आयुक्तालयात अर्ज प्राप्त होतात, त्यानंतर त्वरित तपास करत सायबर भामट्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. सायबर गुन्हे कक्ष येथे सामान्य नागरिकांची ऑनलाईन फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच तात्काळ ज्या बँक खात्यात किंवा वॉलेटमध्ये रक्कम जमा झाली आहे, त्याचा शोध घेऊन सायबर गुन्हे कक्षाचे पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार या रकमेबाबत संबंधित बॅंकेशी संपर्क साधून ती रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देत आहेत. पोलिस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्षाचे पोलिस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील चाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, हवालदार माधुरी धिंडे, प्रवीण आव्हाड, अंमलदार गणेश इलग, पल्लवी निकम, सुवर्णा माळी, अमिना पठाण आदींनी सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी यश मिळवले आहे.
------------
दाखल गुन्हे
२०२२ : २७३८
२०२१ : ९९४
------------
परत मिळवलेली रक्कम
२०२२ : ९१,९४,८३३
२०२१ : २८,८०,९६९
--------------------
सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. पोलिसांना अशा प्रकरणाचा तपास करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांनी सावधपणे केला पाहिजे. यूपीआयचा पिन हा शेयर करू नका, तसेच अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देणे टाळा.
- सुजितकुमार गुंजकर, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे कक्ष
-------------------
हनी ट्रॅपपासून सावधान
समाजमाध्यमांवरून होणारी ओळख अनेकदा महागात पडते. यात अनोळखी व्यक्ती व्हिडीओ कॉल करून आक्षेपार्ह गोष्टींचे चित्रिकरण केले जाते. त्यानंतर त्याच्या मदतीने ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचा प्रयत्न होतो. आपली समाजात बदनामी होईल या भीतीने काही जण या जाळ्यात अडकतात, त्यामुळे अनोळखी मुलींशी समाजमाध्यमांवर काही क्षणाकरिता केलेली मैत्री पश्चातापाची वेळ आणू शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
------------------
परदेशी ओळख महागात
समाजमाध्यमांवर अनेकदा परदेशी नागरिक म्हणून ओळख केली जाते, एकमेकांना मोबाईल क्रमांक दिला जातो. त्यानंतर भेटण्यास एअरपोर्टवर आलो, मात्र कस्टम किंवा अन्य बहाणा सांगून पैशांची गरज आहे असे सांगून पाठवण्याची विनंती करून लाखो रुपयांचा गंडा घातला जातो.
-------------------
जनजागृतीसाठी सेल्फी स्टॅंड
सायबर गुन्हे कक्षाकडून आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सायबर तपासाबाबत २२ ठिकाणी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच सायबर गुन्हे फसवणुकीच्या प्रकारांबाबत माहिती देण्याकरीता १२ विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायबर गुन्हे कक्षाकडून सायबर तक्रारींमध्ये होणाऱ्या नागरिकांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी व सायबर फसवणुकीबाबत जनजागृती निर्माण होण्याकरीता स्वतंत्र सेल्फी स्टॅंडची उभारणी करण्यात आली आहे.
---------------
फसवणूक झाल्यास काय कराल?
तात्काळ नजीकच्या पोलिस ठाणे, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी, असे आवाहन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने नागरिकांना केले आहे.
....
मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास - https://www.ceir.gov.in/home/in/index.jsp
बँक/विमा कंपनी यांच्याविषयी तक्रार - https://sachet.rbi.org.in/
हरवलेले, गहाळ झालेले कागदपत्र, वस्तू तक्रारीसाठी- https://www.mbvv.mahapolice.gov.in/
फसवे एसएमएस, ई-मेल्स, कॉल - https://www.reportphishing.in/

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com