
नवी मुंबईत चार अपघातात चौघांचा मृत्यू
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन दिवसांत चार अपघातांत चार
जणांचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातांत दोन मोटरसायकल चालक; तर दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. दोन अपघातांना जबाबदार असलेल्या चालकांनी अपघाताची खबर न देता पलायन केल्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
२५ जानेवारीला ठाणे-बेलापूर मार्गावरील अपघातात अंकित सतीश मोरे (वय २३, रा. जुहूगाव, वाशी) याचा मृत्यू झाला. तो मोटरसायकलवरून कामावर जात असताना खैरणे येथील यू-ब्रिजवर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी मध्यरात्री टेम्पोतून पार्सल घेऊन दादर येथून पुणे येथे जाणाऱ्या रविकांत तिवारी हा पहाटेच्या सुमारास पळस्पे येथे आला होता. यावेळी संतोष उदावंत (वय ५२) याने खोपोली येथे जाण्यासाठी त्याच्याकडे लिफ्ट मागितली होती. त्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर अमोल पेट्रोल पंपाजवळ कंटेनरवर त्याचा टेम्पो धडकला. यात संतोष याचा मृत झाला असून पनवेल तालुका पोलिसांनी रविकांत तिवारी याला अपघाताला जबाबदार धरून त्याला ताब्यात घेतले.
२५ जानेवारीच्या अपघातात समशेर नाजीम खान (वय ३८, रा. मानखुर्द) याचा मृत्यू झाला. २४ जानेवारीला तो उलवे परिसरात भंगार वेचण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी तो उरण-बेलापूर मार्गावरून रस्ता ओलांडून जात असताना, अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. एनआरआय पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. २६ जानेवारीला अतिश नंदकुमार भोईर (वय २५, रा. सुकापूर, नवीन पनवेल) हा मित्रांसह क्रिकेट खेळून घरी परतताना मित्र नागेश याला मोटरसायकलवरून भोकरपाडा येथे सोडण्यासाठी जात होता. वाहनाला ओव्हरटेक करून भरधाव वेगाने जात असताना, आकुर्ली गावाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोला त्याच्या मोटरसायकलची धडक बसली. यात त्याचा मृत्यू; तर नागेश जखमी झाला. या अपघाताला अतिश हा जबाबदार असल्याचे आढळून आल्याने खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.