
बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा
रेवदंडा, ता. २८ (बातमीदार) : प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी मुंबईत सहा इसम बॉम्बस्फोट घडवणार आहेत, अशी माहिती रायगड नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार रेवदंडा पोलिसांनी तपास करत पश्चिम बंगालमधून मजुरीसाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात खोटी माहिती देत अफवा पसरल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. रायगड नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार घोटवडे, उसर येथे जात संशयित आरोपी तपन धीरेन मंडळ (वय ४०, मूळ रा. महादीपूर, हटकपाडा, जि. मालदा, पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने मृत झालेल्या पत्नीच्या मोबाईलवरून फोन केल्याचे उघड झाले. रेवदंडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास मुपडे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.