
क्रेनची लोकलला धडक, मोटरमन जखमी
मुंबई, ता. २८ : पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव स्थानकात लिफ्टचे काम सुरू असताना क्रेनचा हूक लोकलला धडकून झालेल्या अपघातात मोटरमन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. नायगाव स्थानकात लिफ्टचा खांब बसवण्याचे काम मध्यरात्री सुरू होते. त्यासाठी क्रेन रेल्वे रुळाला समांतर उभा ठेवण्यात आला होता; परंतु त्याचवेळी क्रेन चालकावर रुळाशेजारी असलेल्या तृतीयपंथींकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे क्रेनचालकाच्या हाताला दुखापत होऊन क्रेन अनियंत्रित झाला आणि नायगाव स्थानकाच्या फलाट एकवर विरार दिशेला जाणाऱ्या लोकलच्या काचेवर क्रेनचा हूक धडकला. यात लोकलची काच फुटून मोटरमनला दुखापत झाली. लोकल कारशेडला जात असल्याने तिच्यात प्रवासी नव्हते. या घटनेनंतर ट्रेन कारशेडमध्ये मार्गस्थ करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.