आरे केंद्र चालक नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरे केंद्र चालक नाराज
आरे केंद्र चालक नाराज

आरे केंद्र चालक नाराज

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : महाराष्ट्र शासनाद्वारे संचालक मुंबई दूध योजनेद्वारे वितरित करण्यात येणारे आरे दूध केंद्रे गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे बंद आहेत. त्‍याचा परिणाम आरे दूध व दुग्ध पदार्थांच्‍या वितरणावर झाला आहे. यामुळे गरजू केंद्रचालकांची फरपट सुरू आहे. पशु, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई दूध योजनेचे महाव्यवस्थापक डॉ. सुहास दळवी यांच्याशी अनेकदा बैठका झाल्या. मात्र प्रश्न सुटला नसल्याने केंद्रचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
मुंबई दूध योजनेचे महाव्यवस्थापक डॉ. सुहास दळवी यांची महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक  झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी आरे केंद्रधारकांच्या अडचणी पुन्हा एकदा मांडल्या. शासन व मुंबई महानपालिका मान्यता असलेले आरेचे वितरण बंद आहे. यामुळे आरे केंद्र संचालकांना विक्री करता व व्यवसायाकरिता दूध योजनेद्वारे वरीलप्रमाणे काहीही उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत शासनाने आरे केंद्र संचालकाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही आहे समस्‍या
आरे केंद्रावर इतर डेऱ्यांचे दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री करण्यास परवानगी दिल्यामुळे आरेचा ग्राहक आरे केंद्रापासून दूर होत आहे. तसेच आरे केंद्रावर आरे उत्पादने आरेचे कोणतेही पदार्थ उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आरे केंद्राच्या संचालनावर होत असून तो हतबल झालेला आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाद्वारे केंद्रनिहाय पडताळणी होऊन केंद्राबाबत सविस्तर माहिती घेण्याचे कामकाज सुरू आहे. या पडताळणीदरम्यान केंद्र संचालकाचे हमीपत्र, करारनामा व भुईभाडे भरले नसल्याचे किंवा इतर कागदपत्रे परिपूर्ण नसल्याचे निदर्शनात आले आहे.

या आहेत  प्रमुख मागण्या
शासनाने तातडीने नवीन करारनामा करणे, नवीन हमीपत्र बनवणे व केंद्रनिहाय भुईभाडे भरून घेण्याबाबत कारवाई सुरू करून सुस्पष्टपणे आदेश केंद्र संचालकाला द्यावेत.
आरे केंद्र संचालकाचे उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक निधीअभावी केंद्र दुरुस्ती व रंगारंगोटी करता आलेली नाही. हा खर्च भागवण्यासाठी केंद्रावर जाहिरात करण्यास  परवानगी द्यावी.
महाराष्ट्र शासनाला मुंबई दूध योजना चालवण्यामध्ये  स्वारस्य नसेल, तर ५० वर्षांपासून कार्यरत असलेली आरे केंद्र ही संचालकांच्या नावे करावीत.
केंद्र संचालक केंद्र चालवण्यास सक्षम नसेल, तर त्याच्या नावे असलेले केंद्र त्याच्या वारसाच्या नावावर करावे.