
मालाड येथून बांगलादेशी नागरिकाला अटक
अंधेरी, ता. १ (बातमीदार) ः मालाड येथून एका बांगलादेशी नागरिकाला कुरार पोलिसांनी अटक केली. शादुल कबीर शेख असे या नागरिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. शादुल हा बांगलादेशातील ढाक्याचा रहिवासी आहे. बांगलादेशातील गरिबीसह उपासमारीला कंटाळून तो मुंबईत पळून आला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो पालघरच्या चायना ब्रिजजवळील परिसरात राहत होता. मालाड परिसरात त्याचे नेहमी येणे-जाणे होते. ही माहिती प्राप्त होताच कुरार पोलिसांनी पुष्पा पार्क सबवे परिसरात पाळत ठेवून शनिवारी शादुल शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे कुठलेही पुरावे सापडले नाही. चौकशीअंती तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. नोकरीच्या निमित्ताने तो मुंबईत शहरात आल्याचे सांगितले. मिळेल ते काम करून तो स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केले असून या मोबाईलवरील एका ॲपच्या माध्यमातून तो बांगलादेशातील त्याच्या नातेवाईक, मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली. लवकरच त्याला बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.