शिक्षक आमदारांचे भवितव्य मतपेटीत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक आमदारांचे भवितव्य मतपेटीत बंद
शिक्षक आमदारांचे भवितव्य मतपेटीत बंद

शिक्षक आमदारांचे भवितव्य मतपेटीत बंद

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३० (बातमीदार)ः विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान रायगड जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) शांततेत झाले. मतदान प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी मतदान केंद्रातील कर्मचारी व रायगड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे, धनाजी पाटील, उस्मान रोहेकर, तुषार भालेराव, रमेश देवरुखकर, बाळाराम पाटील, प्रा. राजेश सोनवणे, संतोष डामसे हे आठ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीचे मतदान रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये घेण्यात आले. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पाच, कर्जत एक, खालापूर एक, महाड एक, माणगाव दोन, तळा एक, म्हसळा एक, मुरूड एक, पनवेल आठ, पेण एक, पोलादपूर एक, रोहा दोन, सुधागड एक, श्रीवर्धन दोन, उरणमध्ये दोन अशा २७ केंद्रांमध्ये सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी शिक्षकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंत ७३.९६ टक्के मतदान नोंद झाली होती. त्यात चार हजार ३५५ पुरुष व पाच हजार ७४६ महिला शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
-------------------------------------------
दीडशे कर्मचाऱ्यांची नेमणूक
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यात पोलिसांचाही समावेश होता. एकूण २७ केंद्रांमध्ये दीडशे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर गर्दी होऊ नये, यासाठी बंदी घालण्यात आली होती. तसेच मतदान प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी सीसी टीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती.