
ठाणे जिल्ह्यातील चार हजार घरकुले अपूर्ण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबियांचे पक्क्या घराचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल योजनेसह राज्य पुरस्कृत घरकुल योजना, महाआवास योजना राबवण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात आजही आवास प्लस, प्राधान्य कर्म आणि राज्य पुरस्कृत योजनांमधील सुमारे चार हजार घरे अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गोरगरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील महापालिकांसह नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजना राबवण्यात येत आहेत. कच्चे घर असलेल्या आदिवासी, गरीब कुटुंबियांना या घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी संबंधीतांना ऑनलाईन अर्ज करावा लागत असल्यामुळे त्यांना मंजुरीदेखील ऑनलाईन दिली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या जातात.
प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यातील २०२१-२२ आवास प्लस प्रपत्र ड मधील दोन हजार ८८७ घरकुलांसह प्राधान्यक्रमातील २१४ तसेच राज्य पुरस्कृत ८६५ घरकुले अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गोरगरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
.......................
घरकुले वेळेत पूर्ण करा- मनुज जिंदल
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या र्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत गटविकास अधिकरी, ग्रामसेवक, गृह निर्माण अभियंता आदी उपस्थित होते. यावेळी आवास प्लस, प्राधान्यक्रम आणि राज्य पुरस्कृत घरकुलांचे काम ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिंदल यांनी दिले.
.................................
ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणांच्या माध्यमातून या योजना राबवण्यात येत आहे. सन २०१६-१७ ते सन २०२०-२१ या पाच वर्षांत जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत आलेल्या उद्दिष्टापैकी ९ हजार ८४७ हजार घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या कुटुंबियांचे पक्क्या घरांची स्वप्नपूर्ती झाली असून स्वप्न सत्यात उतरले आहे.
.................................
अमृत महाआवास अभियान २० नोव्हेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत राज्यभर राबवण्यात येत आहे. या अभियानात ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त उपक्रम राबवून अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.
- छायादेवी शिसोदे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे