‘शिक्षक’साठी ९१ टक्के मतदान

‘शिक्षक’साठी ९१ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ३०) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी ९१.०२ टक्के मतदान झाले. एकूण ३८,५२९ मतदारांपैकी ३५,०७० जणांनी मतदान केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ९७.४१ टक्के; तर पालघर जिल्ह्यात सर्वात कमी ८७.८७ टक्के मतदान झाले. गुरुवारी (ता. २) मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. त्यामुळे या दोन उमेदवारांत थेट लढत होत असल्याचे वातावरण होते. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे समाविष्ट आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील १५,३०० पैकी १३,५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ८८.८६ टक्के मतदान झाल्याची माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक विभागाने दिली. यामध्ये ७,९६१ महिला; तर ५,६३४ पुरुष मतदारांनी मतदान केले. मतदान केलेल्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत होते.

रायगड जिल्ह्यात ९३ टक्के मतदान
अलिबाग (बातमीदार) : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात ९,४५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात ९३.५६ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक विभागाकडून मिळाली. कोकण शिक्षक मतदारसंघात जिल्ह्यात १०,१०१ मतदार आहेत. सकाळपासून मतदारांकडून मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक केंद्रात स्वयंस्फूर्तीने मतदान करण्यासाठी रांग लागल्याचे दिसून आले. सायंकाळी चार वाजेपर्यंत ४,१४३ पुरुष व ५,३०७ महिला शिक्षक मतदारांनी मतदान केले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्यात ८८ टक्के मतदान
पालघर (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ८८.०२ टक्के मतदान झाले. ६,८४४ शिक्षक मतदारांपैकी ६,२४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील काही बुथवर शिक्षकांऐवजी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली दिसून आली. निवडणूक शिक्षक मतदारसंघाची की विधानसभेची, असा प्रश्न मतदारांसमोर निर्माण झाला होता. काही बुथवर शिक्षक फिरकलेच नसल्याचे चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com