
दिवा डंम्पिंग ग्राऊंड आजपासून बंद?
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : गेली अनेक वर्षे कचरामुक्तीच्या प्रतीक्षेत असलेला दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड उद्यापासून (ता. ३१) कायमचा बंद होणार असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आलेल्या माजी नगरसेवकाने केला आहे. त्यामुळे दिवेकरांची डम्पिंग ग्राऊंडपासून अखेर सुटका झाल्याचा आनंदही उद्या साजरा केला जाणार आहे. मात्र याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
ठाणे महापालिकेकडे स्वत:चे डम्पिंग ग्राऊंड नसल्याने गेली अनेक वर्षे दिवा येथील भूखंडावरच कचरा संकलित केला जात आहे. या भूखंडाचे डम्पिंग ग्राऊंडमध्ये रूपांतर होऊन त्याची क्षमता काही वर्षांपूर्वीच संपली आहे. संपूर्ण ठाणे शहराचा कचरा येथे टाकला जात असल्यामुळे दिवेकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच वारंवार कचऱ्याला लागणाऱ्या आगी आणि त्यामधून निघणाऱ्या धुराच्या लोटांमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पण प्रत्येक महापालिका निवडणुकीत दिवेकरांना केवळ आश्वासनांचे गाजरच दाखवण्यात आले होते.
दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद करून डायघर येथे शास्त्रशुद्ध कचरा प्रकल्प सुरू करण्यात ठाणे महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. पण तरीही येत्या वर्षभरात हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. दिवा येथे जाणारा कचरा कोट्यवधी रुपये भाडे देऊन भंडार्ली येथे साठवण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे ३१ जानेवारीला दिवा डम्पिंग ग्राऊंड कायमचे बंद करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या दिवा महोत्सवात माजी महपौर नरेश म्हस्के यांनी तसे सूतोवाचही केले होते. त्यानंतर भाजपनेही हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत डम्पिंग ग्राऊंड बंद होणार की नाही, याविषयी दिवावासीयांना धाकधूक लागली होती.
भंडार्लीमध्ये तात्पुरती सोय
माजी उपमहापौर आणि नगरसेवक रमाकांत मढवी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने दिलेल्या शब्दानुसार दिवा डम्पिंग ग्राऊंड उद्यापासून बंद होणार असल्याचा दावा केला. नियोजनानुसार आता या डम्पिंग ग्राऊंड कचऱ्याचा एकही डम्पर किंवा घंटागाडी येणार नसून सर्व कचरा भंडार्ली येथे रवाना होणार असल्याचे सांगितले. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही पुष्टी दिलेली नाही. त्यामुळे दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद होणार की पुन्हा नवीन तारीख मिळणार, याकडे दिवावासीयांचे लक्ष लागले आहे.