
ओंकार विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन
मुरुड, ता. ३१ (बातमीदार) ः मुरुड -जंजिरा हिंदू एज्युकेशन सोसायटी व विश्व हिंदू परिषद संचलित ओंकार बालवाडी व ओंकार विद्या मंदीराचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या वेळी ओंकार बालवाडी व विद्या मंदिरातील सुमार २२० विद्यार्थ्यांनी पोवाडे, लोकगीते सादर केली. विविध प्रकारची वेशभूषा सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रविता गार्डी यांनी केले. तर सूत्रसंचलन सुनील विरकुड यांनी आणि आभार संध्या मसाल यांनी मानले.
या वेळी बोलताना सनदी लेखापाल विकास सरंगळे म्हणाले की, समुद्र किनारी विस्तीर्ण पाटांगण लाभलेल्या या सरस्वतीच्या मंदिराची शाळा चक्रीवादळात ओकीबोकी झाली. पण जिद्द कायम ठेवत विश्वस्तांनी लोकसहभागातून ही शाळा पुन्हा उभी केली. येथील शिक्षिका समर्पित वृत्तीने ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. ध्येयाने प्रेरीत असलेली ही संस्था निश्चितपणे प्रगतीपथावर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात माजी मुख्याध्यापिका वैशाली कासार म्हणाल्या की, मोबाईलचा योग्य वापर केला तर संवाद कौशल्या, हस्तकला, चित्रकला यांसारखे अनेक विषय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना निश्चित वाव देतील. त्यासाठी पालकांनी वेळ काढून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी मुख्याध्यापिका वैशाली कासार यांच्यासह विकास सरंगळे, विश्वस्त दिलीप जोशी, मनोहर गुरव, बालवाडी अध्यक्षा स्नेहा गद्रे, दीपाली जोशी, उपाध्यक्ष दतात्रय गायकवाड, शिक्षक - पालक संघ उपाध्यक्ष सागर राऊत, उषा खोत, मनिषा फाटक, प्रतिक्षा गायकर, कार्याध्यक्षा संध्या मसाल, मुख्याध्यापिका प्रविता गार्डी आदी मान्यवर उपस्थित होते .