
म्हात्रेंचा विजय निश्चित ः नाईक
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. तुर्भे येथील नवी मुंबई महापालिका शाळेमध्ये मतदान केंद्रावर मतदान झाले. डॉ. संजीव नाईक आणि संदीप नाईक यांनी या ठिकाणी महायुतीच्या मतदान बुथला भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी डॉ. संजीव नाईक म्हणाले, की ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होणारच आहेत. जास्तीत जास्त बहुमताने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचे अनुदान, पेन्शन, मान्यता असे अनेक प्रश्न त्यांनी निकाली काढले आहेत. शिक्षकांचा आमदार शिक्षकच असायला हवा. ज्ञानेश्वर म्हात्रे हे स्वतः शिक्षक असून आमदार नसतानाही त्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचे अनेक प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवले आहेत.