
रेल्वेच्या ड्रोनवर सुरक्षाऐवजी स्वच्छतेचा बोजा!
रेल्वेच्या ड्रोनवर सुरक्षेऐवजी स्वच्छतेचा बोजा!
इतर विभागांच्या वाढत्या मागणीमुळे आरपीएफ पोलिसांचा खोळंबा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : रेल्वे सुरक्षा, अपघात आणि लोहमार्गावरील मालमत्ता यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दोन वर्षांपूर्वी ‘निन्जा यूएव्ही’ हायटेक ड्रोन खरेदी केले होते. आता सुरक्षेनंतर रेल्वेमार्गावर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी ‘निन्जा यूएव्ही’ ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर मध्य रेल्वेच्या इतर विभागातूनही ड्रोनची मागणी वाढली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या ‘निन्जा यूएव्ही’ ड्रोनचा वापर सुरक्षेऐवजी स्वच्छतेच्या पाहणीसाठी का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे परिक्षेत्र, रेल्वे ट्रॅक विभाग, यार्ड, कार्यशाळा इत्यादी रेल्वे क्षेत्रात चांगली सुरक्षा व पाळत ठेवण्यासाठी मुंबई विभागाने २०१८ मध्ये दोन ‘निन्जा यूएव्ही’ ड्रोन खरेदी केले आहेत. ड्रोन उडविण्यासाठी ‘आरपीएफ’च्या मॉडर्नरायझेशन सेलमधील चार कर्मचाऱ्यांच्या पथकाला तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. रेल्वेच्या संपूर्ण मालमत्तेचे स्वरक्षण आणि रेल्वेच्या संवेदनशील परिसरातील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दोन ड्रोन खरेदी करण्यात आले होते; मात्र सध्या त्यांचा वापर सुरक्षेऐवजी स्वच्छता पाहणीसाठी रेल्वेकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वच्छतेच्या कामाच्या पाहिणीसाठी काही अधिकाऱ्यांकडूनही आरपीएफ पोलिसांच्या ड्रोनची मागणी केली जाते. त्यामुळे ‘निन्जा यूएव्ही’ ड्रोनबरोबर रेल्वे पोलिसांनाही पाठवावे लागते. त्यामुळे पोलिसांच्या कामाचा खोळंबा होतो, अशी माहिती ‘आरपीएफ’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई मध्य रेल्वेचा सर्वाधिक मोठा विभाग आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त उपनगरीय लोकल मुंबईत धावतात. परिणामी, गुन्हेगारीचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे रेल्वे परिसरातील गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रोनला इतर विभागांकडूनही मागणी होत आहे. परिणामी रेल्वे मालमत्तेची तपासणी आणि यार्ड्स, वर्कशॉप्स, कारशेड इत्यादींच्या ठिकाणी होणाऱ्या पेट्रोलिंगवर परिणाम होत असल्याचे ‘आरपीएफ’तर्फे सांगण्यात आले.
असा आहे ड्रोन
- ‘निन्जा यूएव्ही’ ड्रोनची परिचालन मर्यादा दोन किलोमीटर आहे
- ड्रोन २५ मिनिटांपर्यंत उड्डाण करतो
- ड्रोनचे टेक ऑफ वजन दोन किलोपर्यंत आहे आणि दिवसाच्या उजेडात १२८० बाय ७२० पिक्सेलवर एचडी प्रतिमा कॅप्चर करू शकतात
- ड्रोनमध्ये रिअल टाइम ट्रॅकिंग व्हीडीही सुविधा आहे
मध्य रेल्वेच्या आरपीएफकडे दोन ड्रोन आहेत. फक्त कारशेड आणि रेल्वे परिसरातील गुन्हेगारी हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.
- ए. के. जैन, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे