ग्रामस्थ मेट्रो कारशेड विरोधावर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थ मेट्रो कारशेड विरोधावर ठाम
ग्रामस्थ मेट्रो कारशेड विरोधावर ठाम

ग्रामस्थ मेट्रो कारशेड विरोधावर ठाम

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : भाईंदरजवळील मोर्वा गावालगतच्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला ठाम विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सुनावणीतही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी कारशेड स्थलांतर करण्याचे मौखिक आदेश दिले असले, तरी जोपर्यंत यासंदर्भातले लेखी आदेश जारी होत नाहीत, तोपर्यंत कारशेडविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
मोर्वा गावातील शेतजमीन मेट्रोच्या कारशेडसाठी आरक्षित करण्यासाठी काढण्यात आलेल्या नोटिशीवर ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या होत्या. त्याची सुनावणी मंगळवारी झाली. या वेळी सुमारे पाचशे ग्रामस्थांसह नगररचना विभागाच्या सहसंचालक, अन्य अधिकारी या सुनावणीला उपस्थित होते. ही सुनावणी बुधवार व गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे. सुनावणीला आलेल्या ग्रामस्थांना त्यांनी नोंदवलेल्या लेखी हरकती व्यक्तिरिक्त अन्य काही सांगायचे आहे का, असे विचारण्यात आले. त्या वेळी कारशेडला ठाम विरोध असल्याचेच ग्रामस्थांनी अधिकाऱ्‍यांना सांगितले, अशी माहिती स्थानिक रहिवासी रमेश पाटील यांनी दिली.
ग्रामस्थांच्या कारशेडला असलेल्या ठाम विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कारशेड सरकारी जागेवर स्थलांतरित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्‍यांना दिले होते. मात्र जोपर्यंत कारशेड सरकारी जागेत स्थलांतरित करण्याचे लेखी आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत कारशेडविरोधातले आंदोलन सुरूच राहणार आहे. लवकरच कारशेडविरोधात जाहीर सभेचे आयोजनदेखील केले जाणार आहे, अशी माहिती कारशेडविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्‍या भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.