एक लाख रुपयांचे प्लास्टिक जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक लाख रुपयांचे प्लास्टिक जप्त
एक लाख रुपयांचे प्लास्टिक जप्त

एक लाख रुपयांचे प्लास्टिक जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ ः स्वच्छ सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे निसर्गाला हानीकारक असणाऱ्या एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे, या दृष्टीने नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महापालिका क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकचा धोका ओळखून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा, तसेच पर्यायी कापडी व कागदी पिशव्यांचा प्राधान्याने वापर करावा, याविषयी महापालिकेच्या वतीने विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरास खीळ बसावी, या दृष्टीने धडक कारवाई करण्यात येत आहे. यात एकूण २० व्यावसायिकांकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सलग २ दिवस कारवाई केली. पहिल्या दिवशी ४० हजार व दुसऱ्या दिवशी ६० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्याकडील प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आहे. यात सेक्टर, २ ऐरोली येथील हॉटेल वृषाली, फिरोज चायनीज सेंटर, साई स्नॅक्स, लोकल कट्टा, महालक्ष्मी भोजनालय, पतंग हॉटेल, बेहप्पा मोमोज, सावित्रीदेवी निषाद या व्यावसायिकांकडे सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने प्रत्येकी ५ हजारप्रमाणे एकूण ४० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
हीच धडक कारवाईची मोहीम दुसऱ्या दिवशीही प्रभावीपणे राबवत सेक्टर २०, ऐरोली गाव, यादवनगर तसेच प्र.क्र. ११, १२, १४, ०६ या परिसरात धडक कारवाई करत ४५ दुकानांची झडती घेण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळलेल्या स्टोअर्स, किराणा भांडार, चिकन शॉप, डेअरी, जनरल स्टोअर्स, फळ विक्रेता अशा १२ व्यावसायिकांकडून प्रत्येकी ५ हजारप्रमाणे एकूण रक्कम ६० हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. प्लास्टिकचा साठाही जप्त करण्यात आलेला आहे.
-----------------------------------
नागरिकांना आवाहन
अशा प्रकारे २ दिवसांत ऐरोली विभाग कार्यक्षेत्रात एक लाख रकमेचा दंड सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली, स्वच्छता अधिकरी सुभाष म्हसे, कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार, अधीक्षक महेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमा केला. तसेच, संबंधित व्यावसायिकांना समज दिलेली आहे. प्लास्टिक ही पर्यावरणासह मानवी जीवनाला सर्वाधिक धोका पोहचवणारी गोष्ट असून सुजाण व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्या देऊच नयेत. तसेच पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.