
मिनिडोअर चालकांसाठी शेवटपर्यंत लढणार ः विष्णू पाटील
पेण, ता. ३१ (वार्ताहर) : पेण नगरपालिका हद्दीत असणारी विक्रम-मिनिडोअर वाहनांची जागा नगरपालिका घेऊ पाहत आहे. या आरक्षित जागेकरीता विक्रम मिनिडोअर चालकांसाठी शेवटपर्यंत लढणार आहे, असे आश्वासन विष्णून पाटील यांनी दिले. यासाठी १० फेब्रुवारी रोजी नगरपालिकेवर वाहन चालकांचा विराट मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पेण विक्रम मिनिडोअर, इको चालक मालक संघटनेची सभा पेण येथील बापदेव देवस्थान सावरसई येथे पार पडली. या वेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष नरेश गावंड, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, मंगेश दळवी, नगरसेवक शोमेर पेणकर, संतोष पाटील आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना विष्णू पाटील म्हणाले, की विक्रम स्टँडच्या जागेतील आरक्षण उठवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. मात्र, सदरची जागा ही पुर्वीपासून घोडा स्टँन्ड म्हणून आरक्षित आहे. शहरात दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने नगरपालिका या वाहनधारकांची गळचेपी करत आहे. त्याचा परिणाम हजारो विक्रम मिनिडोअर चालकांवर होणार असल्याने आपण नगरपालिकेला एक इंचही जागा देणार नसल्याचे पाटील यांनी बजावले. येत्या दहा फेब्रुवारीला चालक वाहक आंदोलन करणार असल्याचे या वेळी ते म्हणाले.