
सोन्याच्या मागणीचा नवा उच्चांक
मुंबई, ता. ३१ : मागील वर्षी सोन्याच्या जागतिक वार्षिक मागणीत सन २०२१ च्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४,७४१ टनांवर गेल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालातून समोर आले आहे. ही सन २०११ पासूनची सर्वोच्च वार्षिक मागणी आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत सामान्य ग्राहकांसहित सर्वच स्तरांमधून मागणी वाढली; तसेच मध्यवर्ती बँकेने केलेल्या खरेदीमुळे दरवाढही झाली आहे. विविध मध्यवर्ती बँकांनी मागील वर्षी ४५० टन सोनेखरेदी केली होती, या वर्षी तो आकडा १,१३६ टनांवर पोहोचला. हा गेल्या ५५ वर्षांमधील उच्चांक आहे. सन २०२२ मध्ये सोन्याचे बार व नाणी यांची मागणी वाढली. चीनमध्ये मागणी कमी झाली, तरी इतरत्र मागणी वाढल्याने तो फटका भरून निघाला; तर त्याच वेळी ईटीएफची विक्रीही कमी झाली व खरेदी वाढली.
मागील वर्षातील सोन्याचा वार्षिक पुरवठाही आधीच्या वर्षापेक्षा दोन टक्के वाढून ४,७५५ टनांवर पोहोचला. खाणींमधील उत्पादनही वाढून ३,६१२ टनांवर गेले.
दरम्यान, उद्या (ता. १) अर्थसंकल्प सादर होणार आहे. सराफा उद्योगाने वाणिज्य मंत्रालयाकडे सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे. वाणिज्य मंत्रालयानेही केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाला हे शुल्क कमी करण्याचे सूचवले असल्याचे रिद्धीसिद्धी बुलियन्सचे (आरएसबीएल) व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले.
-------------
देशातील सोन्याची मागणीत घट
देशात सन २०२२ मध्ये सोन्याची मागणी ७७४ टन (२०२१ मध्ये ७९७ टन) होती. २०२१ मध्ये दागिन्यांची मागणी ६१० टन होती; तर मागील वर्षी ती ६०४ टनांवर घसरली. सोन्याच्या किमती वाढल्याने या दागिन्यांचे रुपयातील मूल्य मात्र आधीच्या वर्षीच्या तुलनेत वाढले. २०२१ मध्ये दागिन्यांचे मूल्य दोन लाख ६१ हजार कोटी होते; तर २०२२ मध्ये ते २ लाख ७२ हजार कोटी रुपये झाले. जुने सोन्याचे दागिने मोडून नवे करण्याचे प्रमाण आधीच्या वर्षापेक्षा ३० टक्के वाढून ते ९७ टनांवर गेले. २०२१ मध्ये ९२४ टन सोने आयात झाले; तर २०२२ मध्ये फक्त ६७३ टन (२७ टक्के कमी) सोने आयात झाले.
...........
विविध मध्यवर्ती बँकांनी सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याची मोठी खरेदी केल्याने मागणी वाढली. वाढत्या व्याजदरांमुळे काही ठिकाणी गोल्ड ईटीएफची विक्री झाली; तर महागाईमुळे बार व नाण्यांमध्ये गुंतवणूक झाली.
- लुईस स्ट्रीट, बाजार विश्लेषक, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल