
४२ वर्षानंतर प्रथमच २४ तास पाणीपुरवठा बंद
मुंबई, ता. ३१ : भांडुप संकुलातील चार हजार व्यासाची जलवाहिनी जोडणी, २४०० आणि १,२०० मिमी व्यासाच्या झडपा बदलणे, जलवाहिनीतील गळती दूर करणे अशा आठ कामांसह उपनगरातील ३० अशी ३८ कामे एकाच वेळी पालिकेच्या जलविभागाने पूर्ण केली. त्यामुळे अर्ध्या मुंबईतील बंद असलेला पाणीपुरवठा २४ तासांनंतर मंगळवारी रात्री उशिरा सुरळीत झाला. यापूर्वी सन १९७९ मध्ये अशा पद्धतीने २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे मंगळवारी सकाळी पूर्ण होणारे काम ८ तास रखडल्याने मुंबईकरांचे मोठे हाल झाले.
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणे, तसेच २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा बसविणे, गळती दुरुस्ती करणे व इतर संलग्न अशी कामे हाती घेण्यात आली होती. भांडुप संकुलातील आठ कामांसह पश्चिम उपनगर व शहर विभाग मिळून ३० कामे अशी एकूण तब्बल ३८ कामे एकाच वेळी सुरू होती. या सर्व कामांसाठी भांडुप संकुल येथील १,९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सुमारे २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी समन्वयाने सर्व कामे पूर्ण करताना, तांत्रिक अडचणीदेखील यशस्वी रीतीने सोडवल्या. जलबोगदा बंद करणे, पाणी उपसून बाहेर काढणे, झडपा बसवणे, छेद जोडण्या करणे, कामे पूर्ण करून पुन्हा वाहिन्यांमध्ये पाणी सोडून योग्य दाबासह यंत्रणा सुरळीत झाल्याची खात्री करणे, ही आव्हानात्मक कामे जलअभियंता खात्याने यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---
कर्मचाऱ्यांचे कौतुक
महानगरपालिकेच्या जल विभागातील १५० कर्मचारी व अधिकारी यांनी झटत काम फत्ते केल्याने अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी भांडुप संकुल येथे भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे २४ तासांसाठी हाती घेतलेल्या या कामामुळे ४२ वर्षांत प्रथमच मुंबईत २४ तास पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.