
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा संघ विजेता
पालघर, ता. २ (बातमीदार) : सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी अनेक वर्षांपासून कला, साहित्य, खेळ या क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व सिद्ध करताना दिसून येतात. त्याच महाविद्यालयाच्या शिक्षकेतर सहकाऱ्यांच्या संघाने आपल्या खेळातून मुंबईमधील दोन महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. वझे केळकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सोनपंत दांडेकर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर सहकाऱ्यांच्या संघाने अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर विकेट घेत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तसेच भवन्स कॉलेज अंधेरी येथे आयोजित खेल उत्सव २०२३ या स्पर्धेमध्येही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद संपादन केले. कर्णधार निखिल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सोनपंत दांडेकर महाविद्यालयाने सांघिक खेळाच्या जोरावर या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. मासूम मोहम्मद वाला यांना मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले. तसेच संघाचे कर्णधार निखिल ठाकूर यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले.