
वाहतूक कोंडीची समस्या सोडवा
भिवंडी, ता. २ (बातमीदार) : वंजारपट्टी नाका ते अंजूरफाटा आणि ठाणे रोड, कल्याण यासह शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी शहरप्रमुख प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने ठाणे वाहतूक डीसीपी डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात गोकुळ कदम, राकेश मोरे, मेहबूब फुलारे, स्वप्नील जोशी, अर्जुन साळुंखे, रईस मोमीन, नूर सय्यद आदींसह शिवसैनिकांचा समावेश होता.
शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्याची मागणी शिष्टमंडळाने वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे केली. भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्र्यांसह तीन आमदार-खासदार असूनही शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्याचा आरोप प्रसाद पाटील यांनी केला. त्यामुळे शहरातील नागरिकांसह वाहनचालकांच्या समस्या लक्षात घेऊन पाटील यांनी शिवसैनिक असल्याने समाजकारणास्तव उपायुक्त डॉ. राठोड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जेणेकरून शहरातील नागरिकांची वाहतूककोंडीच्या समस्येतून सुटका होईल.
----------------------
बैठकीचे आयोजन करु
वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची आखणी करण्यासाठी डॉ. राठोड यांच्यासमोर नकाशा सादर करण्यात आल्याचे प्रसाद पाटील यांनी सांगितले. त्यावर चर्चा करून उपायुक्त राठोड यांनी लवकरच भिवंडी शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची वाहतूककोंडीच्या समस्येतून सुटका होणार आहे. यामुळे शहरातील वाहतूककोंडीच्या समस्येतून नागरिकांची नक्कीच सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.